सलामी लढतीतील पराभवांमुळे दोन्ही संघांसमोर आजची लढत शर्थीची
दुबई / वृत्तसंस्था
पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागल्यानंतर आता दुसऱया व शेवटच्या आशिया चषक लढतीत श्रीलंकेचा बांगलादेशविरुद्ध मुकाबला रंगणार आहे. बांगलादेशचा संघ टी-20 क्रिकेट प्रकारात नेहमी मुसंडी मारण्याच्या निर्धारानेच मैदानात उतरतो. त्यामुळे, लंकन संघासमोर आणखी कडवे आव्हान असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार ही लढत आज (दि. 1) सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाईल.
आशिया चषक स्पर्धेतील सलामी लढतीत यापूर्वी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी लंकन फलंदाजी लाईनअपला जबरदस्त सुरुंग लावला आणि त्यानंतर धावांचा यशस्वी पाठलाग करत लंकेला 8 गडय़ांनी धूळ चारली.
अफगाणची गोलंदाजी लाईनअप अव्वल दर्जाची आहे. मुस्तफिजूर उत्तम गोलंदाज आहे. शकीब जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. पण, या दोघांचा अपवाद वगळता त्यांचे अन्य गोलंदाज तितके प्रभावी नाहीत. त्यामुळे, अफगाणच्या तुलनेत बांगलादेशचा संघ किंचीत सोपा प्रतिस्पर्धी भासतो, असे शनाका यापूर्वी म्हणाला होता.
अफगाणिस्तानचे पेसर्स फझलहक फारुकी व नवीन-उल-हक यांनी लंकन फलंदाजीचा कणा मोडून काढला होता. मात्र, शनाकाने आपला संघ बांगलादेशचे आव्हान मोडीत काढण्यासाठी सज्ज असल्याचा दावा केला. ‘येथील हवामान आमच्यासाठी फारसे अनुकूल नाही. फारुकी दोन्ही बाजूंनी चेंडू स्विंग करतो. नवीन-उल-हकचे चेंडू बऱयाचदा स्विंग होतात. त्यामुळे, आम्हाला दक्ष तरी रहावेच लागेल’, असे शनाकाने येथे नमूद केले.
भानुका राजपक्षला सुपर-4 फेरीचे वेध
पहिल्या लढतीतील पराभवामुळे लंकेला आज कोणत्याही परिस्थितीत विजय प्राप्त करावा लागेल, हे स्पष्ट आहे. या संघातील आघाडीचा गोलंदाज भानुका राजपक्षला मात्र त्यापूर्वीच सुपर-4 फेरीचे वेध लागले आहेत. आशिया चषक स्पर्धेतील आजच्या पाचव्या लढतीत जो संघ विजयी ठरेल, तो सुपर-4 फेरीत पोहोचण्याची शक्यता अधिक असेल. यापूर्वी आपल्या पहिल्या लढतीत दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
बांगलादेशला यापूर्वी मंगळवारी झालेल्या अफगाणविरुद्ध लढतीत 7 गडय़ांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचा संदर्भ देत राजपक्षने बांगलादेशवर अधिक दडपण असेल, असा दावा केला. मागील काही सामन्यात लंकेने त्यांच्यावर वर्चस्व गाजवले आहे, असेही तो येथे म्हणाला.