डोके अन् मानेच्या कॅन्सरचे मुख्य कारण तंबाखू सेवन : ओठ-तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक : डॉक्टरांकडून त्वरित उपचार आवश्यक

प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्सर किंवा कर्करोग म्हटल्यास आजही भीती वाटतेच. मात्र सावधानता, व्यसनांपासून दूर राहणे, नियमित तपासणी करणे, यामुळे अनेकांना आपण दूर ठेवू शकतो तसेच कॅन्सरलाही दूर ठेवू शकतो. कॅन्सर वेगवेगळय़ा स्वरुपाचा असू शकतो. अलिकडे डोके आणि मानेचा कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याबाबत जागरुकता निर्माण करून सावधानतेचा इशारा देण्यासाठी ‘जागतिक फेडरेशन ऑफ हेड ऍण्ड नेक ऑन्कॉलॉजी सोसायटीने 2014 मध्ये 27 जुलै हा जागतिक डोके आणि मानेचा कॅन्सर दिन म्हणून आचरण्यात आणण्याचे जाहीर केले.
ग्लोबोकॅन 2020 नुसार 2020 साली एकूण 13,24,413 नवीन कॅन्सर रुग्ण आढळून आले. त्यापैकी 851678 मृत झाले आहेत. ओठ आणि तोंडाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक आहे. डोके आणि मानेच्या कॅन्सरचे मुख्य कारण तंबाखू सेवन आहे. तंबाखू चघळणे, गुटखा, धूम्रपान, मद्यपान हे आहे. कोणत्याही प्रकारचे मद्यपान किंवा धूम्रपान म्हणजे ते सेकेंडरी (पॅसिव्ह) असले तरी ते वाईट आहे. हे लोकांना समजले पाहिजे.
तोंडातील अल्सर अनेक दिवस कमी न होणे, तोंडाला सूज येणे, अन्न खाताना वेदना होणे, गाठ झालेल्या ठिकाणी रक्तस्राव, मानेवर सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, दात पडणे, कवळीचा त्रास होणे, नाकातून रक्त येणे अशी काही डोके आणि मानेच्या कॅन्सरची प्रमुख लक्षणे आहेत. अशा कॅन्सरचे निदान क्लिनिकल तपासणी दरम्यान आणि टिश्यू बायॉप्सी करून होवू शकते.
प्रत्येक रुग्णाची उपचारपद्धती वेगवेगळी असू शकते. कॅन्सर कोठे झाला आहे व कोणत्या टप्प्यावर आला आहे हे महत्त्वाचे आहे. उपचार पद्धतीत प्रामुख्याने शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी व किमोथेरपीचा अवलंब केला जातो. भारतात कॅन्सरचे निदान होऊनही ते गुप्त ठेवण्याची मानसिकता असल्याने तीन चतुर्थांश रुग्ण बरे होण्याची शक्मयता कमी आहे.
लोकांना जागरुक करणे महत्त्वाचे
रेडीएशन, उन्हात राहणे, सकस आहाराचा अभाव यामुळे सुद्धा कॅन्सर होण्याची शक्मयता वाढते. भारतामध्ये आपल्याला कॅन्सर होऊच शकत नाही. या भ्रमात राहून किंवा शस्त्रक्रियेच्या भीतीमुळे रुग्ण डॉक्टरांकडे येण्याचे टाळतात. लोकांना जागरुक करणे हे महत्त्वाचे आहे. फक्त तंबाखू आणि मद्यपान बंद केले तरी कर्करोगाची शक्मयता कमी होवू शकते. कोणत्याही स्वरुपाचे लक्षण आढळल्यास त्वरित डॉक्टरांना दाखविणे हे श्रेयस्कर ठरते.
– डॉ. राजेंद्र मेटगुडमठ
सिनियर हेड ऍण्ड नेक सर्जन-केएलई हॉस्पिटल