अदानी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सेबीचे प्रतिपादन, गुंतवणूकदारांचा पैसा सुरक्षित असल्याची ग्वाही
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अदानी उद्योगसमूह प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आता सेबींनेही गुंतवणूकदारांना विश्वास दिला आहे. शेअरबाजारातील चढउतार आणि अस्थिरता नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती साधने आणि इच्छाशक्ती समभाग आणि रोखे मंडळाकडे (सेबी) आहे. गुंतवणूकदारांचा पैसा सुरक्षित राहील याची पूर्ण दक्षता आम्ही घेत आहोत. त्यामुळे चिंतेचे कारण नाही, असे प्रतिपादन संस्थेने केले.
गेल्या आठवडय़ात शेअरबाजारात मोठय़ा प्रमाणात चढउतार झाले. ही स्थिती अनोखी होती. अदानी समूहाच्या समभगांमध्ये मोठी घसरण पहावयास मिळाली. हिंडेनबर्ग रिसर्चस् या अमेरिकेतील संस्थेने अदानी समूहावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. त्या पार्श्वभूमीवर सेबीने भूमिका स्पष्ट केली.
बारकाईने लक्ष
अशा प्रकारची प्रकरणे जेव्हा समोर येतात तेव्हा सेबी आपले उत्तरदायित्व व्यवस्थित पार पाडते. आमचे काम शेअरबाजारातील व्यवहारांवर नियंत्रणाचे आहे. आम्ही अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्टस् आणि अदानी स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि अंबुजा सिमेंटस् या कंपन्यांच्या व्यवहारांवर लक्ष ठेवले आहे. जशी स्थिती निर्माण होईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. येत्या काही महिन्यांपर्यंत त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. सध्या चिंता वाटावी अशी कोणतीही घटना घडलेली नाही. सेबीने आतापर्यंतच्या प्रत्येक संवेदनशील प्रकरणात आवश्यकता असताना हस्तक्षेप केलेला आहे. त्यामुळे ताज्या घडामोडींकडेही कोणतेही दुर्लक्ष केले जाणार नाही. काही दिवसांमध्ये स्थिती स्पष्ट होणार आहे, असे सेबीने स्पष्ट केले.
अदानींचा नकार
आपल्या समूहाने कोणतेही गैरकृत्य केल्याच्या आरोपाचा अदानी समूहाने इन्कार केला आहे. हिंडेनबर्गचे अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर समूहाच्या वतीने 400 पानी स्पष्टीकरण प्रसिद्ध केले. मात्र अदानींच्या समभागांची घसरण सुरु आहे. विशेषतः विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार समभागांची विक्री करत आहेत. समूहाची आर्थिक स्थिती उत्तम आहे. गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण व्हावे आणि समूहासंबंधी असणारा विश्वास अधिक दृढ व्हावा यासाठी आम्ही पूर्ण सब्रस्क्राईब झालेली समभाग विक्री रद्द करुन गुंतवणूकदारांना पेसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडे पैशाची चणचण नाही, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
शेअरबाजाराचीही तयारी
मुंबई शेअरबाजार आणि राष्ट्रीय शेअरबाजार यांनी अदानी उद्योसमूहासंबंधी जागरुकतेची भूमिका घेतली असून समूहाच्या तीन कंपन्यावर बारकाईने लक्ष ठेवले आहे. लघुकालीन अतिरिक्त देखरेख उपाययोजना या व्यवस्थेच्या अंतर्गत (एएसएम) अदानी समूहाचे विश्लेषण केले आहे. या व्यवस्थेअंतर्गत शेअरबाजारातील व्यवहारांमध्ये चालणारे शॉर्ट सेलिंग बंद केले जाते. अदानी समूहाच्या समभागांचे शॉर्ट सेलिंग होऊ नये म्हणून कारवाई करण्यात आली आहे. परिणामी, येत्या काही दिवसांमध्ये शेअरबाजार स्थिरावू शकतो. यापुढेही परिस्थितीनुसार कठोर नियमांचे क्रियान्वयन करण्यात येईल. सध्या शेअरबाजार स्थिरतेच्या दिशेने वाटचाल करीत आहे, स्पष्टीकरण संबंधितांनी केले आहे.
अन्य समभागांमध्ये तेजी
शुक्रवारी आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी शेअरबाजारात अदानी समूह वगळता अन्य समभागांच्या व्यवहारांमध्ये तेजी असल्याचे दिसून आले आहे. आता रविवारीही शेअरबाजाराला सुटी असून सोमवारचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. या दिवशी शेअरबाजारची दिशा आणि दशा काय राहणार आहे, याकडे सारे गुंतवणूकदार आणि तज्ञांचे लक्ष असून आगामी आठवडाच निर्णायक ठरेल.
व्यवहारांवर कसोशीने लक्ष
ड अदानी समूहाच्या आर्थिक व्यवहारांवर शेअरबाजार, सेबीचे लक्ष
ड सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सुरक्षेसंबंधी निर्धास्तपणा
ड परिस्थिती पाहून पुढील कारवाई करणार ः सेबीकडून घोषणा
ड बँका आणि अदानी समूहाच्या गुंतवणूकदारांकडून विश्वास व्यक्त