मारियुपोलमध्ये कंपनीच्या दोन्ही प्रकल्पांवर रशियाचा कब्जा
युक्रेनची सर्वात मोठी पोलाद कंपनी मेटिनवेस्टने रशियाच्या कब्जातील क्षेत्रात आता उत्पादन करू शकणार नसल्याचे म्हटले आहे. या कंपनीचे प्रकल्प मारियुपोलमध्ये असून या शहरावर रशियाच्या सैन्याने कब्जा केला आहे. ही कंपनी युक्रेनच्या एकूण पोलाद निर्मितीत 40 टक्के हिस्सेदारी बाळगून आहे. या कंपनीकडून मोठय़ा प्रमाणावर युरोपीय देशांना निर्यात केली जात होती.
युरोपसाठी निर्यात होणाऱया पोलादाचा सर्वात मोठा निर्यातदार युक्रेन आहे. परंतु रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधून होणारी निर्यात कमी होत निम्म्यावर आली असल्याचे कंपनीचे मालक आणि युक्रेनमधील सर्वात धनाढय़ रीनत अखमेतोव्ह यांनी म्हटले आहे. मारियुपोलच्या बंदरानजीक मेटिनवेस्टचे इलीच आणि अजोवस्टाल हे दोन मोठे प्रकल्प आहेत. रशियाच्या सैन्याचा दोन्ही प्रकल्पांसह पूर्ण औद्योगिक क्षेत्रावर कब्जा झाला आहे.
प्रकल्पांचे मोठे नुकसान
रशियाच्या बॉम्बवर्षावामुळे दोन्ही प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले आहे. अशांततेच्या स्थितीत प्रकल्प पुन्हा सुरू करणे शक्य नाही. रशियाच्या कब्जामध्ये कंपनी कुठल्याही स्थितीत काम करू इच्छिणार नाही. युद्धात युक्रेनच्या विजयानंतर स्थिती सुधारल्यावर प्रकल्पांमधून उत्पादन सुरू करण्यासंबंधी विचार केला जाईल असे मेटिनवेस्टकडून म्हटले गेले. मारियुपोलमधील हे दोन्ही प्रकल्प युक्रेनच्या एकूण पोलाद निर्मितीत एक तृतीयांशहून अधिक हिस्सा बाळगून आहेत.
प्रकल्पांचे आधुनिकीकरण
युद्ध सुरू होण्यापूर्वी मेटिनवेस्टने यंदा आधुनिकीकरण आणि नव्या निर्मिती सुविधांमध्ये एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखली होती. 19 मार्च रोजी अजोवस्टल प्रकल्पावर दोन तोफगोळे पडले होते. तर अवदिवका कोक प्रकल्पाच्या क्षेत्रात काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला होता अशी माहिती अखमेतोव्ह यांनी दिली आहे.