एका वर्षाच्या बालकाला जन्मताच किडणीचा आजार : उपचार खर्चिक असल्यामुळे समाजासमोर मदतीचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
गावात पोटा-पाण्याची व्यवस्था नसल्याने वर्षभर गावोगावी हिंडायचे, लोक हातावर टेकवतील ती भाकरी घेऊन आपल्या आयुष्याच्या गाडा ओढायचा, ही भटक्मया विमुक्त जातीतील प्रत्येक कुटुंबाची व्यथा. त्यातच जर एखाद्याला दुर्धर आजार झाला तर मग देवाच्या भरवशावर सोडून दिल्याशिवाय पर्याय नसतो. अशा परिस्थितीतही अंगावरचे दागिने, घरातील साहित्य विकून एक आई आपल्या तान्हय़ा बाळाचा उपचार करत आहे. उपचार खर्चिक असल्यामुळे ती आता समाजासमोर मदतीचे आवाहन करीत आहे.
मूळचे मानेवाडी (ता. मंगळवेढा जि. सोलापूर) येथील भटके विमुक्त समाजातील काहीजण पोटा-पाण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेलगत असणाऱया गावांमध्ये फिरत असतात. साईबाबा, स्वामी समर्थ, विठ्ठलाची मूर्ती व पालखी घेऊन ते गावोगावी फिरतात. सध्या यातील काहीजणांचा मुक्काम हिंडलगा येथील माळरानावर आहे. शिवमनगरनजीक माळावर त्यांनी आपल्या झोपडय़ा बांधल्या आहेत. यापैकी प्रवीण सोळंखे या एका वर्षाच्या बालकाला जन्मताच किडणीचा आजार जडला. या बालकावर काही महिन्यांपूर्वी बेळगावच्या केएलई रुग्णालयात उपचार करण्यात आले. परंतु पुढील उपचार हा खर्चिक असल्याने सोळंखे कुटुंबीय अगतीक झाले आहे.
अंगावरील सोने विकून उपचार
मागील दोन महिन्यांपासून हिंडलगा येथे तंबू मारून ते राहत आहेत. बालकावर उपचार तर करायला हवेत. परंतु प्रश्न येत होता तो पैशांचा. ओळखीतील सर्व पाहुण्यांकडून थोडे फार पैसे घेतले तरी 2 लाख रुपये जमविणे अशक्मय होते. त्यामुळे अंगावरील सोने व इतर साहित्य विकून पैशांची जोडणी करण्यात आली. शस्त्रक्रिया झाली तरी पुढील खर्च करणे शक्मय नसल्याने लोकांकडून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
एका किडणीवर तो आयुष्य कसा जगणार?

प्रवीण दिवसरात्र झोपत नाही. त्याला होणाऱया त्रासामुळे तो सतत रडत राहतो. एवढय़ा लहान वयात त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. जर शस्त्रक्रियेचा उपयोग झाला नाही तर एक किडणी काढावी लागेल, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे माझा मुलगा एका किडणीवर संपूर्ण आयुष्य कसे काढेल, ही चिंता झोपू देत नाही.
– रेश्मा सोळंखे (बालकाची आई)
दारिद्रय़ामुळे उपचार करणेही कठीण

भटक्मया विमुक्त जातीमधील नागरिकांच्या पाचवीलाच दारिद्रय़ पुजलेले आहे. लोकांनी दिलेल्या अन्नधान्य व पैशांवर त्यांचे घर चालते. प्रवीणच्या किडणीमध्ये दोष असल्यामुळे तो दिवसरात्र रडत असतो. त्यामुळे त्याचे ते रडणे जीव पिळवटून टाकणारे असते. आमच्याकडे पैसे असते तर आम्ही मोठय़ा रुग्णालयात जावून उपचार केला असता. पण झोपडीत राहणाऱया आमच्याकडे औषध-गोळय़ांनाही पैसे नाहीत.
– दादाराव शिंदे (बालकाचे चुलत आजोबा)