बाकनूर येथील गोडसे गल्लीतील रस्त्याची दुरवस्था : नागरिकांतून अनेक तक्रारी
वार्ताहर /किणये
बाकनूर गावातील गोडसे गल्लीतील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून या रस्त्यातूनच विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. तालुक्मयाच्या पश्चिम भागातील बाकनूर गावचा समावेश बेळवट्टी ग्रामपंचायतीमध्ये होतो. गोडसे गल्ली (रिंगरोड) बाकनूरच्या या रस्त्याकडे गेल्या 15 वर्षांपासून ग्राम पंचायतीचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत
आहेत.
गोडसे गल्लीतील या रस्त्यावरून रोज महिला, शेतकरी व विद्यार्थी ये-जा करतात. मात्र, रस्त्याची सद्यस्थिती पाहता चालत जाणेही मुश्किल बनले आहे. सदर रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला शाळा व अंगणवाडी असल्याने चिखलातूनच विद्यार्थ्यांना चालत जावे लागत आहे, अशी माहिती पालकांनी दिली.
प्रशासनामार्फत ग्रामीण भागासाठी अनेक योजना राबविल्या जातात. मग या रस्त्यासाठी कोणतीही योजना मंजूर का होत नाही? असा सवाल नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे.
बेळवट्टी ग्राम पंचायतीने या रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे कामकाज त्वरित हाती घ्यावे, अशी मागणी पालकांतून होत आहे.
ग्रामपंचायतचे दुर्लक्षच

गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही या रस्त्यासाठी धडपडतो आहे. कित्येक वेळा बेळवट्टी ग्राम पंचायतीकडे निवेदनाद्वारे रस्ताकामाची मागणी करण्यात आली. तरीही यांच्याकडून दुर्लक्षच झालेले आहे. दोन महिन्यांपूर्वी पुन्हा ग्राम पंचायतीला निवेदन दिले आहे. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष व पीडीओ यांनी रस्ता करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सध्याही रस्ता याच अवस्थेत आहे.
रवळू गोडसे