22 फूट खोलात पडला होता चिमुकला मुका जीव : पिपल्स फॉर अॅनिमल पफ्पुदा रेस्क्यु टीमचे बचावकार्य यशस्वी
प्रतिनिधी/कोल्हापूर
तब्बल बावीस फूट खोलवर असलेल्या खुल्या बोअरवेलमध्ये (बोरिंग, कूपनलिका) पडलेल्या कुत्र्याच्या चिमुकल्या पिल्लाला जीवदान देण्याचे काम पिपल्स फॉर अॅनिमल पफ्पुदा रेस्क्यु टीमने केले. निगडेवाडी-गांधीनगरातील या बचावकार्यात श्वास कोंडून ठेवणारा थरार गुरूवारी सकाळी (30 जून) उपस्थितांनी अनुभवला.
निगडेवाडी-गांधीनगर येथे बुधवारी रात्री खुल्या बोरवेलमध्ये कुत्र्याचे छोटे पिल्लू रात्रीच्या वेळी पडले. त्या पिल्लाची आई त्याला शोधू लागली. पिल्लू सापडत नाही, म्हणून ती सैरभैर झाली. पहाटेच्या सुमारास तिने लगत राहत असलेल्या राणाराम प्रजापती यांच्या घराजवळ भुंकण्यास प्रारंभ केला. भुंकण्याच्या आवाजाने प्रजापती जागे झाले. पिल्लाच्या आईबरोबर ते बोरवेलच्या ठिकाणी आले. तेथे पिल्लाच्या आईने जमिन पायाच्या नखाने खोदण्याचा प्रयत्न केला. जणू तिला सांगायचे होते की, माझे बाळ बोअरवेलमध्ये पडले आहे. त्याचवेळी प्रजापती यांना कुत्र्याच्या पिल्ल्याच्या विव्हळणाचा आवाज येऊ लागला. त्यांनी खुल्या, उघडय़ावर असलेल्या बोअरवेलमध्ये पाहिले असता, तो आवाज खोलवरून येत असल्याचे दिसले.

बोअरवेलमध्ये पिल्लू पडले होते. ते घाबरले होते, विव्हळत होते. प्रजापती यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलवून त्या पिल्लाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काही जमेना. वेळ जात होता, त्यामुळे उपस्थित चिंतेत पडले होते. अखेर त्यांनी पिपल्स फॉर अॅनिमलच्या पफ्पुदा रेस्क्यु टीमच्या प्रशांत साठे यांना मोबाईल कॉल करून संपर्क केला. साठे आणि त्यांची सहकारी ऐश्वर्या गुमास्ते तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी बोअरवेलमध्ये पडलेल्या पिल्लाचा अंदाज घेतला. आपले कौशल्य वापरत त्यांनी त्या पिल्लाला वीस मिनिटांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर बोअरवेलमधून बाहेर काढले. त्यावेळी पिल्लू प्रचंड घाबरले होते, थरथरत होते. पण त्याच्या आईकडे सुपूर्द करताच ते बागडू लागले. एका पिल्लाला वाचविल्याचे समाधान स्थानिक नागरिकांसह पफ्पुदा रेस्क्यु टीमच्या सदस्यांच्या तोंडावर होते. यापूर्वी कोरोनाच्या लाŸकडाऊन काळात 2021 मध्ये गांधीनगरमध्ये अशा खुल्या बोअरवेलमध्ये पडलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला प्रशांत साठे आणि त्यांच्या सहकाऱयांनी जीवदान दिले होते. त्यावेळचा अनुभव यावेळी उपयोगी ठरला, असे प्रशांत साठे यांनी सांगितले.