वृत्तसंस्था/ दोहा
रोमहर्षक लढतीत सर्बियाचा 3-2 अशा फरकाने पराभव करून स्वित्झर्लंडने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या शेवटच्या 16 संघात स्थान मिळविले. पहिल्या सत्रात उभय संघ 2-2 अशा बरोबरीत खेळत होते. शेर्दान शाकिरी, ब्रील एंबोलो व रेमा प्रॅवलरने स्वित्झर्लंडसाठी तर आलेक्झांडर मित्रोविच व व्लाहोविच यांनी सर्बियासाठी गोल केले. आता बाद फेरीत स्वित्झर्लंडची लढत 6 डिसेंबरला पोर्तुगालशी होईल.
या गटात स्वित्झर्लंडचे 3 सामन्यांतून दोन विजयाने 6 तर सर्बियाचा फक्त एक गुण झाला. पहिल्या सत्रात उभय संघांकडून आक्रमक चाली रचल्या गेल्या. सामन्याची सुरूवातच धडाकेबाज पद्धतीने झाली. दुसऱयाच मिनिटाला स्वित्झर्लंडच्या ब्रील एंबोलोने बॉक्समधून हाणलेला शक्तिशाली फटका सर्बियाचा गोलरक्षक मिलिनकोविचने ब्लॉक केला. त्यानंतर दहाव्या मिनिटाला सर्बियाला गोल करण्याची संधी मिळाली होती. यावेळी दूसान ताडिकने दिलेल्या पासवर आंद्रिजा झिवकोविचने मारलेला फटका गोलपोस्टला आदळून परत आला. मात्र आलेल्या रिबाऊंडरवर आलेक्झांडर मित्रोविचला गोल करणे जमले नाही.
20 व्या मिनिटाला स्वित्झर्लंडने आपले गोलचे खाते उघडले. यावेळी झिब्रील सॉ याच्या पासवर शाकिरीने सर्बियाचा गोलरक्षक मिलिनकोविचला भेदले व चेंडू जाळीत सारला. मात्र स्वित्झर्लंडची ही आघाडी जास्त वेळ टिकली नाही आणि पाचच मिनिटांनी सर्बियाने बरोबरी साधली. यावेळी डाव्या बगलेतून दूसान ताडिकने केलेल्या क्रॉसवर एका जबरदस्त हेडरवर आलेक्झांडर मित्रोविचने गोल करून सामना 1-1 असा बरोबरीत आणला.
या बरोबरीनंतर आरंभालाच पिछाडीवर राहिलेल्या सर्बियाचा खेळ अधिक बहरला व त्यानी स्वित्झर्लंडवर दुसरा गोल करून आघाडीही घेतली. बचावफळीत स्वित्झर्लंडच्या खेळाडूने केलेल्या चुकीचा फायदा घेत दूसान व्लाहोविचने गोलरक्षक कॉबेलला चकवत चेंडूला जाळीत टाकले. पहिले सत्र संपण्यास एक मिनिटाचा अवधी असताना स्वित्झर्लंडने बरोबरी साधली. शाकिरीच्या पासवर वीदमेरने हा गोल केला.
दुसऱया सत्रात 49 व्या मिनिटाला स्वित्झर्लंडने आपल्या विजयी गोलची नोंद केली. एंबोलो, शाकिरी व वर्गास यांनी रचलेल्या चालीवर रेमो प्रेवलरने सर्बियाच्या गोलरक्षकाला भेदले व स्वित्झर्लंडचा तिसरा गोल केला. त्यानंतर सर्बियाने लुका जॉविच व नेमान्झा गुडेल्झ यांना संधी दिली. 58 व्या मिनिटाला एंबोलोची अगदी जवळून गोल करण्याची संधी हुकली. शेवटच्या क्षणी इंज्युरी वेळेत सर्बियाला गोल बाद करण्याचीही संधी मिळाली होती. मात्र यावेळी रॅडोन्झिकने ती बाहेर मारून वाया घालविली.