प्रतिनिधी /बेळगाव
मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्याचा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने बजावला आहे. त्यामुळे हे काम युद्धपातळीवर सुरू असून शुक्रवारी सकाळी महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी महसूल अधिकाऱयांची बैठक घेऊन विविध सूचना केल्या. घरोघरी जाऊन नागरिकांकडून आधार ओळखपत्र घेऊन लिंक करण्याची सूचना केली.
आधार ओळख क्रमांक मतदार यादीला जोडण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे ही जबाबदारी महापालिकेच्या महसूल विभागातील महसूल निरीक्षकांकडे सोपविण्यात आली आहे. बुथ लेव्हल ऑफिसरद्वारा प्रत्येक मतदाराचे आधार ओळखपत्र मिळवून तो क्रमांक लिंक करण्याची सूचना करण्यात आली आहे. प्रत्येक बीएलओकडून दररोज 50 मतदारांचे आधार क्रमांक लिंक करण्याचे टार्गेट महसूल निरीक्षकांना देण्यात आले आहे. त्यामुळे महसूल निरीक्षक बीएलओसमवेत या कामात गुंतले आहेत. आधार क्रमांक लिंक करण्यासाठी महाविद्यालय आणि गल्लोगल्ली जागृती करण्याची सूचना करण्यात आली आहे.
आधार ओळखपत्रामुळे अनेक गैरप्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिक आधार ओळखपत्र देण्यास टाळाटाळ करीत आहेत. पण कोणत्याही परिस्थितीत आधार लिंक करा, अशी सूचना महसूल निरीक्षकांना करण्यात आली आहे. या कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी शुक्रवारी सकाळी महसूल निरीक्षकांची बैठक घेतली. तसेच विविध सूचना केल्या. जागृती मोहीम राबवून आधार लिंकचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आदेश बजावला.
तसेच नगरसेवकांची बैठक घेऊन आधार लिंकबाबत महसूल विभागाच्यावतीने माहिती देण्यात आली. तर उत्तर विभागातील नगरसेवकांना शुक्रवारी बैठकीचे आमंत्रण देण्यात आले होते. उपमहापौर कक्षात नगरसेवकांची बैठक घेऊन आधार लिंकबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करून सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली.