दुबई येथील ‘डब्ल्यूटीए 1000’ स्पर्धा ठरणार अखेरची, त्यापूर्वी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभाग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची प्रख्यात टेनिसपटू सानिया मिर्झाने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त होण्याचे ठरविले असून दुबई येथे होणाऱया ‘डब्ल्यूटीए 1000’ स्पर्धेतून आपण निवृत्त होणार असल्याचे दुहेरीतील जागतिक क्रमवारीत एकेकाळी पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या या खेळाडूने जाहीर केले आहे. महिला टेनिस संघटनेच्या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सानियाने तिच्या निवृत्तीबद्दल ही घोषणा केली आहे.
त्यापूर्वी ही 36 वषीय टेनिसपटू कझाकिस्तानच्या ऍना डॅनिलिनासोबत जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला दुहेरीत खेळणार आहे. गेल्या वषी अमेरिकन ओपनला मुकल्यानंतर ग्रँड स्लॅम स्पर्धेतील तिचा हा अंतिम सहभाग राहील. घोटय़ाच्या दुखापतीचा सामना करत असलेल्या सानिया मिर्झाने 2022 च्या हंगामाच्या शेवटी निवृत्त होण्याची योजना आखली होती. परंतु ऑगस्टमध्ये झालेल्या कोपराच्या दुखापतीमुळे तिला अमेरिकन ओपनमध्ये सहभागी होता आले नाही.
‘2003 मध्ये मी व्यावसायिक टेनिसपटू बनल्यानंतर झालेल्या वाटचालीत माझे प्राधान्यक्रम बदलले आहेत. आता प्रत्येक दिवशी माझ्या शरीराला मर्यादेपर्यंत ढकलणे यास माझे प्राधान्य राहिलेले नाही’, असे सानियाने यासंदर्भात बोलताना म्हटले आहे. पती व माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्यासोबत एका दशकाहून अधिक काळ तिचे निवासस्थान हे दुबई राहिले. निवृत्तीनंतर ती तेथे प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे.
सहा ग्रँड स्लॅम किताबांची मानकरी
सानिया मिर्झाला भारताची महान महिला टेनिसपटू म्हणून ओळखले जाते. तिने दुहेरीत सहा ग्रँड स्लॅम किताब जिंकलेले आहेत. या महिन्यात ज्या अंतिम प्रमुख स्पर्धेत तिचा सहभाग राहणार आहे त्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये 2016 साली तिने महिला दुहेरीचा मुकूट जिंकला होता. मिर्झा ही 2005 मध्ये हैदराबादमधील स्पर्धा जिंकून ‘डब्ल्यूटीए’ स्पर्धेचे एकेरी विजेतेपद प्राप्त करणारी पहिली भारतीय बनली. 2007 पर्यंत तिने आघाडीच्या 30 खेळाडूंमध्ये प्रवेश केला आणि त्याच वर्षी जागतिक क्रमवारीत 27 वा क्रमांक गाठला. हे तिच्या कारकिर्दीतील सर्वोच्च स्थान ठरले.
सानिया मिर्झाने 2009 मध्ये महेश भूपतीसोबत ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीचे पहिले विजेतेपद पटकावले. त्यानंतर 2012 साली प्रेंच ओपनमध्ये भूपतीसोबत दुसरा विजय मिळवला. तिचे मिश्र दुहेरीतील तिसरे विजेतेपद 2014 च्या अमेरिकन ओपनमध्ये ब्राझिलियन खेळाडू ब्रुनो सोरेससमवेत नेंदले गेले. 2015 मध्ये सानिया मिर्झाने स्वित्झर्लंडची दिग्गज खेळाडू मार्टिना हिंगीससोबत मैदानात जोडी जमविली. या जोडीने विम्बल्डन, ऑस्ट्रेलियन ओपन व अमेरिकी ओपनसह 14 जेतेपद प्राप्त केली.