स्फोटात एक ठार ः संबंधित इसम होता एनआयएच्या रडारवर
@ वृत्तसंस्था / कोइम्बतूर
तामिळनाडूच्या कोइम्बतूरमध्ये एका मंदिरासमोर झालेल्या कार विस्फोटामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. या स्फोटात मारले गेलेला 25 वर्षीय जमीशा मुबीनची एनआयएने 2019 मध्ये चौकशी केली होती. जहरान हाशिमशी संबधित एका कट्टरवादी नेटवर्कप्रकरणी ही चौकशी झाली होती. जहरान हाशिम हा श्रीलंकेतील ईस्टर संडे स्फोटांचा सूत्रधार होता. तामिळनाडू पोलिसांनी कारमधील सिलिंडर स्फोटात मारले गेलेल्या इसमाच्या घरातून स्फोटक सामग्री हस्तगत केली आहे. यातील पोटॅशियम नायट्रेट यासारखी सामग्री भविष्यात दहशतवादी हल्ल्यांसाठी वापरली जाणार होती.
कारमधील सिलिंडर स्फोटामुळे जमीशा मुबीनचा मृत्यू झाल्यावर आता संभाव्य दहशतवादी कटाचे संकेत मिळाले आहेत. तामिळनाडूचे पोलीस महासंचालक सी. सिलेंद्र बाबू यांनी दहशतवादी कटाबद्दल नकार दिला नसला तरीही पोलीस याप्रकरणी अधिक माहिती देणे तूर्तास टाळत आहेत. दहशतवाद्याच्या घरातून जप्त सामग्री भविष्यातील हल्ल्यांसाठी वापरली जाण्याची शक्यता होती, याचमुळे सर्व शक्यतांचा विचार करत तपास केला जात असल्याचे पोलीस महासंचालकांनी सांगितले आहे.
या प्रकरणाची चौकशी एनआयएला सोपविण्यासंबंधीचा निर्णय पुढील काळात घेतला जाणार आहे. स्फोटात ठार झालेल्या जेमिशा मुबीनची एनआयएने काही वर्षांपूर्वी चौकशी केली होती, परंतु त्याच्या विरोधात कुठलाही गुन्हा नोंद नव्हता तसेच त्याच्याविरोधात कुठलीच माहिती प्राप्त झाली नव्हती असे पोलीस अधिकाऱयाने सांगितले.

कोइम्बतूर शहरातील सांप्रदायिक स्वरुपाने संवेदनशील असलेल्या भागात कार स्फोट झाल्याने पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत. संबंधित वाहनात खिळे आणि अन्य सामग्री मिळाली असून त्याची फॉरेन्सिक विभागाकडून तपासणी करण्यात येत आहे. मुबीनच्या घराची झडती घेतली असता स्फोटक सामग्री पोटॅशियम नायट्रेट, ऍल्युमिनियम पावडर, चारकोल, सल्फर हस्तगत झाले आहे. या सामग्रीचा वापर बॉम्बनिर्मितीसाठी केला जातो. मुबीन कदाचित आत्मघाती हल्ल्याची योजना आखत असावा अशी शक्यता असल्याने विस्तृत तपास केला जात असल्याचे पोलीस महासंचालकांनी सांगितले आहे.
संवेदनशील भागात स्फोट
कोइम्बतूरच्या कोट्टई ईश्वरन मंदिरानजीक हा स्फोट झाला होता. हा भाग सांप्रदायिक स्वरुपाने संवेदनशील असल्याने स्थिती तणावपूर्ण आहे. परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली असून तेथे मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हिंदू मुन्नानी या संघटनेने या स्फोटाची विस्तृत चौकशी करण्याची मागणी केली आहे. शहरात दंगली भडकविण्याचा हा कट होता का हे पोलिसांनी तपासावे. विस्तृत तपासातून लोकांच्या मनातील शंका दूर होतील असे हिंदू मुन्नानीचे प्रदेशाध्यक्ष कदेश्वर सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे.
राज्य गुप्तचर विभागाचे अपयश
कोइम्बतूर स्फोटाप्रकरणी भाजपने द्रमुक सरकारला लक्ष्य केले आहे. हा एक दहशतवादी हल्ला होता असा दावा तामिळनाडू भाजप अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी केला आहे. इस्लामिक स्टेटशी निगडित दहशतवाद्याने हे कृत्य केले आहे. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे सरकार या हल्ल्याबद्दल माहिती लपवू पाहत आहे. राज्याची गुप्तचर यंत्रणा आणि द्रमुक सरकारचे अपयश म्हणजे हा स्फोट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राज्यात काही दहशतवादी घटक सक्रीय असून स्फोटात मारले गेलेल्या आरोपीचे इस्लामिक स्टेटशी संबंध होते असे अण्णामलाई यांनी म्हटले आहे.