अधिकाऱयांच्या विरोधात कट रचतोय आयएसआय
@ वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि गुन्हेगारांच्या संपत्ती जप्त करण्यात आल्याने पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी तेथील सैन्य आणि पाकिस्तान सरकारवर यावरून दबाव आणला आहे. याचमुळे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय आता काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची संपत्ती जप्त करणाऱया अधिकाऱयांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय अधिकाऱयांमध्ये भीती निर्माण करण्याचा कट आयएसआयने रचला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या इनपूटनुसार आयएसआयने स्वतःच्या हस्तकांना जम्मू-काश्मीरमध्ये तैनात महसुल विभागाचे अधिकारी आणि तालुक्यात तैनात अधिकाऱयांविषयी माहिती मिळवून देण्याचा आदेश दिला आहे.

भारत सरकारकडून दहशतवाद्यांची संपत्ती जप्त करण्यात येत असल्याने पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. याचमुळे या दहशतवाद्यांनी आता पाकिस्तानी सैन्य आणि तेथील प्रशासनावर दबाव टाकला आहे. याचमुळे आयएसआयने आता भारतीय अधिकाऱयांना लक्ष्य करण्याचा कट रचला असल्याचे समजते. आयएसआयचे हस्तक भारतीय अधिकाऱयांवर हल्ला करण्याचा कट रचू शकतात. अशाप्रकारच्या हल्ल्यांमुळे अधिकाऱयांमध्ये दहशत निर्माण होत ते दहशतवाद्यांची संपत्ती जप्त करण्यास नकार देतील असा यामागे आयएसआयचा डाव आहे.
मागील काही महिन्यांदरम्यान भारतीय तपास यंत्रणांनी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशावर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद फैलावणाऱया दहशतवाद्यांवरील कारवाईचा विळखा आणखी घट्ट केला आहे. याच्या अंतर्गत अंमलबजावणी संचालनालय (ईडी), एनआयए समवेत अन्य यंत्रणांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गुन्हेगारीच्या वापरातून मिळविण्यात आलेल्या संपत्ती जप्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
तपास यंत्रणांनी अलिकडेच इंडियन एअरलाइन्स आयसी814 विमान अपहरणावेळी सोडण्यात आलेला दहशतवादी मुस्ताक लटरम उर्फ जरगरची संपत्ती जप्त केली होती. याचबरोबर कुपवाडामध्ये कुख्यात दहशतवादी बशीर अहमदची संपत्ती जप्त करण्यात आली होती. बशीर अहमदची अलिकडेच पाकिस्तानच्या रावळपिंडीत अज्ञातांकडून हत्या करण्यात आली आहे. तपास यंत्रणांनी याचबरोबर हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बासितची बारामुल्ला येथील संपत्तीही जप्त केली आहे.
याचबरोबर लष्कर-ए-तोयबा प्रमुख हाफिज सईदशी संबंधित अनेक संपत्ती, फुटिरवादी नेता शब्बीर अहमद शाहच्या अनेक संपत्ती आणि हिजबुल मुजाहिदीन कमांडर सैयद सलाउद्दीनशी संबंधित अनेक संपत्ती तपास यंत्रणांनी जप्त केल्या आहेत. अशाप्रकारची कारवाई सुरू झाल्याने पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या दहशतवाद्यांच्या पायाखालील जमीन सरकू लागले आहे. तर दहशतवाद्यांकडून असलेला धोका पाहता या कारवाईत सामील अनेक अधिकाऱयांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.