40 वर्षांनी होणार चौकशी ः दक्षिण कोरियातील घटनेने पूर्ण जग हादरले
वृत्तसंस्था / सोल
दक्षिण कोरियातून सुमारे 2 लाख मुलांना 1950-80 दरम्यान अडॉप्शन एजेन्सींनी विदेशात अवैध मार्गाचा अवलंब करत पाठविल्याचे समोर आले आहे. यातील हजारो मुलांची ओळख लपवत विदेशात दत्तक देण्यात आल्याचा खुलासा एनपीआर या अमेरिकन प्रसारमाध्यमाने केला आहे. दक्षिण कोरियातील शासकीय यंत्रणाही या घोटाळय़ात सामील असल्याचा आरोप होत आहे. तर याप्रकरणी दक्षिण कोरियाच्या सरकारने एक आयोग स्थापन केला असून त्याला ट्रुथ अँड रिकंसिलेशन कमिशन नाव देण्यात आले आहे. फसवणुकीद्वारे विदेशात दत्तक देण्यात आलेल्या मुलामुलींच्या नोंदी हा आयोग पडताळणार आहे.
अडॉप्शन एजेन्सींनी खोटी माहिती देत अनेक मुलांना युरोपमध्ये दत्तक दिलेल्या प्रकरणांची चौकशी सुरू करणार आहोत असे दक्षिण कोरियाच्या ट्रुथ अँड रिकंसिलेशन कमिशनने म्हटले आहे. एनपीआरच्या अहवालानुसार आतापर्यंत दक्षिण कोरियातून दत्तक घेलेल्या सुमारे 400 जणांनी स्वतःच्या दत्तकप्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. चौकशीच्या अर्जासाठी सरकारने 9 डिसेंबर ही अंतिम मुदत घोषित केली होती. कमिशन प्रारंभी केवळ 34 प्रकरणांची चौकशी करणार आहे.

आयोगाच्या चौकशीच्या निष्कर्षाच्या आधारावर अन्य लोक देखील अडॉप्शन एजेन्सी किंवा सरकार विरोधात भरपाईसाठी खटला दाखल करू शकणार आहेत. तर फसवणुकीचे आरोप झालेल्या एजेन्सींमध्ये दोन मोठय़ा कंपन्या सामील आहेत. हॉल्ट चिल्ड्रन सर्व्हिस, कोरिया सोशल सर्व्हिस अशी या कंपन्यांची नावे आहेत. 2024 पूर्वी ही चौकशी पूर्ण होण्याचा अनुमान आहे.
खोटी माहिती देत मुलांना युरोप किंवा अमेरिकेत दत्तक देण्याची बहुतांश प्रकरणे 1950-80 च्या कालावधीतील आहे. अनेक प्रकरणांमध्ये खोटं सांगून दत्तक दिलेली मुले ही गरीब कुटुंबातील आणि अविवाहित महिलांची होती. दत्तक देण्यासाठी या मुलांच्या कागदपत्रांमध्ये बदल केले जात होते. या कागदपत्रांमध्ये मुलांना अनाथ दर्शविण्यात येत होते आणि त्यांच्या आईवडिलांनाही मुले कुणाकडे सोपविली हे सांगितले जात नव्हते.
दत्तक घोटाळय़ाची पार्श्वभूमी
1954 मध्ये अमेरिकेतील बर्था आणि हॅरी हॉल्ट नावाचे दांपत्य कोरियन युद्धात अनाथ झालेल्या मुलांवरील एक प्रेझेंटेशन पाहण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान दक्षिण कोरिया युद्धाच्या प्रभावातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत होता. प्रेझेंटेशनमधील मुलांना पाहून बर्था यांनी ही मुले देखभालीसाठी कुणाचा तरी शोध घेत असावेत अशी भावना व्यक्त केली हेती. त्यावेळी अमेरिकेत विदेशातून दोनहून अधिक मुले दत्तक घेण्यावर बंदी होती, परंतु 1955 मध्ये ओरेगनच्या दोन सिनेटर्सनी कोरियन युद्धात अनाथ झालेल्या मुलांसाठी एक विधेयक सादर केले, जेणेकरून होल्ट आणि त्याच्या पत्नीला कोरियातील अनाथ मुलांना दत्तक घेता येईल. काँग्रेसमधून विधेयक संमत झाल्यावर होल्ट यानी कोरियातील 4 मुले आणि चार मुलींना दत्तक घेतले. यासंबंधीचे वृत्त प्रकशित होताच अमेरिकेत कोरियन मुलामुलींना दत्तक घेण्याची चढाओढ सुरू झाली.
एक वर्षात होल्ट दांपत्याने एक दत्तक कार्यक्रम सुरु केला, त्यानंतर दक्षिण कोरियात देखील होल्ट एजेन्सी स्थापन करण्यात आली. या एजेन्सीने हळूहळू अमेरिकेसह अनेक युरोपीय देशांमधील लोकांनाही मुले दत्तक दिली. ही एजेन्सी सद्यकाळात विदेशातील सर्वाधिक मुले दत्तक देणाऱया एजेन्सींपैकी एक आहे.