10 जण किरकोळ जखमी : मुरगोडजवळील दुर्घटना
वार्ताहर /बैलहोंगल
राज्य परिवहनच्या बसचा ब्रेक निकामी झाल्याने बस थेट शेतात शिरल्याची घटना मुरगोड-सौंदत्तीच्या रस्त्यावर बुधवारी घडली. या अपघातात बसमध्ये बसलेले दहा जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी यरगट्टीच्या सरकारी ईस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
केवळ दैवबलवत्तर म्हणून 20 हून अधिक प्रवाशांचा जीव वाचला. तत्पूर्वी बसने रस्त्याशेजारी उभ्या केलेल्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीची मोडतोड झाली आहे. सदर बस शेतात घुसली तेंव्हा शेताच्या मधोमध विद्युतखांब होता. आकस्मात विद्युत खांबाला धडक बसली असती तर मोठा अनर्थ घडला असता. चालकाच्या सावधानतेमुळे जीवितहानीचा धोका टळला.
सौंदत्ती डेपो येथील राज्य परिवहनची ही बस सुमारे तीस ते चाळीस प्रवाशाना घेऊन सौंदत्तीहून सोमापूरमार्गे तल्लूर गावाला जात होती. सदर बस मुरगोड गावाजवळ येताच बसचा ब्रेक अचानक निकामी झाल्याने बसचालकाला काय करावे ते कळेना. शेवटी प्रसंगावधान ओळखून बसचालकाने बस रस्त्याशेजारच्या शेतात घुसवली.
यावेळी कांही प्रवाशी किरकोळ जखमी झाले. अपघातग्रस्त बसला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. मुरगोड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.