आकर्षक चित्ररथ, रोमटामेळ पथके व लोकनृत्यांच्या सादरीकरणाने रंगत, शोभायात्रा पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने गर्दी
प्रतिनिधी/ मडगाव
’विटेवरी उभा कटेवरी हात, काय मौजेचा पंढरीनाथ’, ‘वा, वा, किती आनंद झाला’, ’गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषात मडगावात शनिवारी पर्यटनखाते तसेच मडगाव शिमगोत्सव समितीने आयोजित केलेली शिमगोत्सव शोभायात्रा उत्साहात पार पडली. रामायण, महाभारत तसेच अन्य पुराणकालीन संदर्भांवर आधारित आकर्षक चित्ररथांनी यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. गोव्याची कृषी संस्कृती, संचित यासहित सामाजिक संदेश देणाऱया चित्ररथांचा समावेशही मिरवणुकीत राहिला. रोमटामेळ, लोकनृत्याचे विविध प्रकार तसेच ढोल-ताशे, शामेळ व इतर पारंपरिक वाद्यांचे वादन यांची जोड त्यांना मिळून मिरवणुकीची रंगत आणखी वाढली.
मडगाव होली स्पिरीट चर्च ते नगरपालिका चौकापर्यंत या जुन्या मार्गाने शिमगो मिरवणूक पार पडली. रस्त्याच्या दुतर्फा मिरवणूक पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने लोक जमले होते. यावर्षी शिमगोत्सव समितीने नगरपालिका चौकात मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱयांकरिता खास आसनव्यवस्था केली होती. याच ठिकाणी श्रीराम जन्मभूमी संकल्पनेवर आधारित व्यासपीठ उभारण्यात आले होते. होली स्पिरीट चर्च परिसरात विधिवत पूजन करून व ’श्री दामोदर देवा’चा जयघोष करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी मडगाव शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत, समितीचे ज्येष्ठ उपाध्यक्ष तथा नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, सरचिटणीस दामू नाईक, खजिनदार तथा मडगाव नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, उपनगराध्यक्षा दिपाली सावळ, अन्य नगरसेवक, समितीचे पदाधिकारी, भाजप प्रदेश सरचिटणीस तथा एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर उपस्थित होते.
मडगाव शिमगोत्सवातील परमोच्च क्षण शनिवारी झालेल्या मिरवणुकीतून सर्वांनी अनुभवला. गोव्यातील कानाकोपऱयातून आलेली विविध रोमटामेळ पथके, घोडेमोडणीसह विविध लोकनृत्य पथके आणि सर्वांची, खास करून बच्चे कंपनीची पसंती लाभलेले आकर्षक चित्ररथ यात सहभागी झाले होते. काणकोणपासून पेडणेपर्यंतच्या पथकांचा यात समावेश राहिला. गोव्याच्या संस्कृतीचे दर्शन या मिरवणुकीतून घडले. धनगर समाजाचे गजानृत्य, वेळीप-कुणबी समाजाचे समईनृत्य, तोणयामेळ, तालगडी, कळशी नृत्य तसेच राज्यातील विविध समाजांची लोकनृत्ये या ठिकाणी पहायला मिळाली. वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा केलेले स्पर्धक तसेच सहभागी झालेल्यांची पडणारी पावले सर्वांचे लक्ष वेधून गेली. तत्पूर्वी संध्याकाळी पालिका चौकात आयोजित केलेल्या वेशभूषा स्पर्धेत कनिष्ठ व वरिष्ठ गटांतून इतिहासकालीन तसेच रामायण, महाभारतकालीन व अन्य आकर्षक वेशभूषा सादर करण्याबरोबर सकारात्मक सामाजिक संदेश देण्यात आला. यावेळी शिमगोत्सव समितीतर्फे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पत्रकार सूरज पवार, महेश कोनेकर, केपेचे मामलेदार प्रतापराव गावकर, शिक्षिका पुष्पा गायतोंडे, मडगाव वाहतूक पोलीस विभागाचे साहिल सकली यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी पारंपरिक संस्कृतीचे जतन करायला हवे असे सांगितले.