मंत्री सुभाष फळदेसाई यांचे उद्गार : साकोर्डा येथे मंदिराची पायाभरणी
प्रतिनिधी /धारबांदोडा
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत. त्यांचे कार्य व शौर्य पुढील अनेक पिढय़ांना प्रेरणादायी ठरावे यासाठी गोव्यात त्यांचे मंदिर व्हावे अशी आपली आंतरिक इच्छा आहे. देशभरात शिवरायांचे अनेक पुतळे व स्मारके आहेत. मात्र गोव्यात त्यांचे मंदिर व्हावे, ही तमाम शिवप्रेमींसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे उद्गार समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी काढले.
मधलावाडा-साकोर्डा येथे नव्याने उभारण्यात येणाऱया शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या पायाभरणी सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलते होते. येथील शिवप्रेमींनी मंदिर उभारण्याचा केलेला संकल्प स्तुत्य आहे. शिवरायांचे मंदिर त्यांची जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात का नाही हा संशोधनाचा विषय असून संपूर्ण देशात त्यांची केवळ तिनच मंदिरे आहेत. शिवाजी महाराजानंतर अनेक संत झाले व त्यांना दैवत प्राप्त झाले. मात्र हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱया या युगपुरुषाचे फक्त चौकात व इतर ठिकाणी पुतळे उभे राहिले आहेत. त्यांच्या भव्य दिव्य अशा कार्यामुळे 340 वर्षानंतरही महाराजांच्या इतिहासाकडे आदर्श म्हणून पाहिले जाते.
यावेळी सावर्डे मतदारसंघाचे आमदार तथा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर, कुंभारजुवा मतदारसंघाचे आमदार राजेश फळदेसाई, धारबांदोडा जि. पं. सदस्य सुधा गावकर, सावर्डे भाजपा मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई, कालेचे सरपंच किशोर देसाई, प्रदीप देसाई, राजेंद्र प्रभूगावकर, धारबांदोडाचे पंचसदस्य विनायक गावस, सावर्डे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष रुपेश देसाई, वसंत देसाई व शिवप्रेमी मोठय़ासंख्येने उपस्थित होते. आमदार गणेश गावकर म्हणाले, छत्रपती शिवरायांचा पुतळा आसपास नाही. मात्र सावर्डे मतदारसंघात त्यांचे मंदिर उभारणे ही आनंदाची गोष्ट आहे. येथील युवकांना त्यातून स्फुर्ती मिळणार असून पर्यटन विकास महामंडळातर्फे या मंदिराला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची घोषणा त्यांनी केली. आमदार राजेश फळदेसाई म्हणाले, शिवाजी महाराजांची कीर्ती हीच युवकांसाठी उर्जा असून नवीन पिढय़ांना त्यातून निश्चितच प्रेरणा मिळेल. रुपेश देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.