पहिलीतील पटसंख्येसाठी शिक्षकांना करावी लागते कसरत
वार्ताहर /खानापूर
खानापूर तालुक्मयातील काही प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळा पारंपरिक शिक्षण पद्धतीला मागे ठेवून तंत्रस्नेही शिक्षण देण्याच्या प्रयत्नात आहेत. अनेक शाळांमध्ये युवा शिक्षकवर्गाने यासाठी विशेष प्रयत्न हाती घेतले असले तरी तालुक्मयातील मराठी प्राथमिक शाळांची स्थिती मात्र चिंताजनक बनत चालली आहे.
तालुक्मयात जवळपास 40 ग्रामपंचायत क्षेत्रात मराठी शाळा आहेत. याच ठिकाणी सरकार जाणीवपूर्वक कन्नड प्राथमिक शाळा सुरू करत आहे. एकीकडे पहिलीत येणाऱया विद्यार्थ्यांची संख्याही कमी आहे. वास्तविक मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. पण मराठी भाषिक नागरिकही आता कन्नड माध्यम शाळांना आपली मुले पाठवत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील मराठी शाळांची पटसंख्या घटत आहे. याच पद्धतीने पटसंख्या कमी होत राहिली तर कर्नाटक सरकार मराठीबहुल प्रदेशातील मराठी शाळा निश्चितच बंद पाडण्यास मागेपुढे पाहणार नाही.
काही धडपडणाऱया शिक्षकांच्या प्रयत्नांतून शाळांचा कायापालट होत आहे. पटसंख्या कमी असल्याने शिक्षकांनाही अपेक्षितपणे शाळांची प्रगती साधण्यासाठी अडचण होत आहे. काही पालक मराठी शाळांच्या विकासासाठी सरसावले आहेत. पण पटसंख्या कमी होत चालल्याने समस्या कायम आहे.
प्रत्येकाचे प्रयत्न गरजेचे
अलीकडे शासन शिक्षकांची रिक्तपदे भरत नसून अतिथी शिक्षक नेमत आहे. शिक्षण खात्याने प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची भरती वेळेवर करणे गरजेचे आहे. बऱयाच शाळांतील शैक्षणिक साहित्य, चांगली इमारत याबाबही प्रयत्न होणे गरजेचे आहे. तालुक्यात मराठी भाषा व मराठी शाळा टिकवायची असेल तर प्रत्येक मराठी पालकाने आपल्या पाल्याला मराठी शाळेतच प्रवेश घेणे गरजेचे आहे.
पाठय़पुस्तकांविना विद्यार्थ्यांचे नुकसान

सायकल-गणवेषाचाही नाही पत्ता : त्वरित योग्य क्रम घेण्याची मागणी
शाळा सुरू होऊन महिना होत आला तरी अद्याप शालेय पाठय़पुस्तके वितरित करण्यात आलेली नाहीत. विद्यार्थ्यांचा अभ्यास रखडला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी शैक्षणिक खात्याने त्वरित कमतरता असलेल्या पाठय़पुस्तकांचे वितरण करावे. शासनाकडून विद्यार्थ्यांना सायकली व गणवेष देण्यात येतो. याचेही अद्याप वितरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे पालक संभ्रमात आहेत. याबाबत शासनाने त्वरित क्रम घ्यावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
शासनाकडून दरवर्षी प्राथमिक विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तके, शालेय गणवेष, सायकल व बूट यांचे वितरण करण्यात येते. मात्र, यावर्षी शालेय पाठय़पुस्तकांचे अद्याप वितरण करण्यात आले नाही. पाचवी ते सातवीपर्यंतच्या मराठी माध्यमाची कोणतीच पाठय़पुस्तके देण्यात आलेली नसल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास रखडलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
कन्नड माध्यमाची पाठय़पुस्तके वितरित करण्यात आली आहेत. मराठी पाठय़पुस्तके योग्य वेळेत वितरित करण्यास सरकार कायमच कुचराई करत असते. याही वर्षी तोच अनुभव येत आहे. पाचवी ते सातवी या विद्यार्थ्यांची कोणतीच पुस्तके दिली गेली नसल्याने विद्यार्थ्यांना गृहपाठ करणे कठीण झाले आहे. शिक्षक मागील वर्षीची पुस्तके घेऊन शालेय अभ्यासक्रम शिकवत आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक महिन्याला चाचणी परीक्षा घेण्यात येते. महिना होत आला तरी पाठय़पुस्तके उपलब्ध नसल्याने अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.
अधिकाऱयांकडून शंका व्यक्त
दरवर्षी विद्यार्थ्यांना शालेय गणवेष देण्यात येतो. एक गणवेष शिवलेला असतो तर दुसऱया गणवेशाचे कापड देण्यात येते. अद्याप शासनाकडून या गणवेषांचेही वितरण करण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेषाशिवाय शाळेत यावे लागत आहे. शासनाच्या धोरणानुसार शालेय गणवेष हा शासनाच्यावतीनेच देत असल्याने इतर गणवेष परिधान करणे नियमबाहय़ आहे. अद्याप गणवेषाचेही नियोजन शाळेकडून झालेले नाही. तसेच बुटांचेही वितरण अद्याप करण्यात आले नाही. याबाबत पाठय़पुस्तक व साहित्य वितरण करणाऱया अधिकाऱयांकडे चौकशी केली असता ते म्हणाले, शालेय पाठय़पुस्तके येत्या आठ दिवसात वितरित करण्यात येतील. मात्र गणवेष, बूट आणि सायकल याबाबत शासनाकडून कोणतेच निर्देश आलेले नसल्याने यावर्षी गणवेष, बूट, सायकल वितरित होईल की नाही, याबद्दल शंका आहे.