आता त्यात ‘राजदंडा’चीही भर, भारताच्या परंपरेचा पुरावा, भाजप-काँग्रेसचे शब्दयुद्ध रंगात

वृत्तसंस्था /नवी दिल्ली
संसदेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनाचा कार्यक्रम अवघ्या दोन तीन दिवसांवर येऊन ठेपला असतानाही त्यासंबंधीचा वाद सुरुच आहे. आता त्यात राजंदड किंवा सेनगोलचीही भर पडली आहे. उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्तेच व्हावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असतानाही, विरोधी पक्षांची सरकारवर टीका होत असून तिला जोरदार प्रत्युत्तरही दिले जात आहे. उद्घाटन कार्यक्रमाला राष्ट्रपतींना आमंत्रण न देऊन केंद्र सरकारने त्या पदाचा अवमान केला आहे, अशी टीका विरोधक करीत आहेत. तथापि, केंद्र सरकारने हा आरोप फेटाळला आहे. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहंकार सुखावण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची टीका करण्यात येत आहे. तर काँग्रेसने या संदर्भातील आपला इतिहास तपासावा. इतरांना घटनेचे डोस पाजविण्याचा बेजबाबदारपणा बंद करावा, असे प्रत्युत्तर भाजपकडून देण्यात आले आहे.
राजदंडाची परंपरा
उद्घाटनाच्या वादात आता राजंदडाचा मुद्दाही पुढे आला आहे. ब्रिटीशांनी हा राजदंड नेहरुंच्या हाती दिला, ही घटना कपोलकल्पित असून तिचा कोणताही पुरावा नाही, असे विधान काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केले. तर याचा पुरावा म्हणून भाजपकडून 1947 ची काही कागदपत्रे आणि नियतकालिके सादर करण्यात आली असून त्यांच्यामध्ये नेहरुंची या राजदंडासह छायाचित्रेही आहेत, असे प्रतिपादन भाजपने केले आहे. हा राजदंड केवळ तामिळनाडूपुरता होता. तो एका धर्मपीठाने नेहरुंना दिला होता. त्याचे कोणतेही राजकीय महत्व नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. तथापि, राजदंड ही केवळ तामिळनाडूची परंपरा नाही. ती साऱ्या भारताची ऐतिहासिक परंपरा आहे, असे प्रत्युत्तर भाजपने दिले आहे.
काँग्रेसला भारतीय परंपरांचे वावडे
काँग्रेसला साऱ्याच भारतीय परंपरांविषयी शत्रुत्व का वाटते, असा खोचक प्रश्न केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी विचारला आहे. आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आणि आपल्या मतपेढीला खूष ठेवण्यासाठी काँग्रेस ऐतिहासिक परंपरांचा अवमान करत असून यामुळे तिची उद्दिष्ट्यो कधीच साध्य होणार नाहीत, असेही प्रतिपादन अमित शहा यांनी शुक्रवारी केले.
विरोधी पक्षांमध्ये फूट
उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याच्या संदर्भात विरोधी पक्षांमध्ये एकमत नाही, हे पुन्हा स्पष्ट झाले. भाजपसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व 18 पक्षांनी या कार्यक्रमाचे समर्थन केले आहे. तर विरोधी पक्षांपैकीही 7 पक्षांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे कार्यक्रमाच्या समर्थनासाठी 25 पक्ष सरसावले असून विरोधात 20 पक्ष आहेत. साधारणपणे 70 टक्के खासदार या प्रश्नावर सरकारचे पक्षधर असल्याचे दिसून येत आहे.
निजद-काँग्रेस वाद
उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर निधर्मी जनता दल आणि काँग्रेस यांच्यात वाद भडकला आहे. निजदचे नेते कुमारस्वामी यांनी काँग्रेस दांभिक असल्याचा आरोप केला. काँग्रेसचे बहिष्काराचे राजकारण संकुचित असून त्यातून या पक्षाचा दुटप्पीपणा दिसून येतो, अशी टीका त्यांनी केली. तर कर्नाटकात मतदारांनी निजदवर बहिष्कार टाकला आहे, हे त्यांनी विसरु नये, असे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले. लोकजनशक्ती पक्षाचे चिराग पास्वान यांनीही काँग्रेसवर टीका केली.
टाईम नियतकालिकातील महत्वाचा लेख
राजंदडासंबंधी माहिती हवी असेल तर विरोधकांनी 1947 मध्ये जगप्रसिद्ध ‘टाईम’ नियतकालिकातील लेख वाचावा, असा खोचक सल्ला केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिला आहे. या लेखात राजदंड कसा ब्रिटीशांकडून कसा देण्यात आला आणि त्याची परंपरा काय आहे, याची पूर्ण माहिती देण्यात आली आहे. विरोधकांनी ती डोळे उघडे ठेवून वाचावी, असे प्रतिपादन त्यांनी केले.