चिन्ह गोठविण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
अण्णाद्रमुकचे निवडणूक चिन्ह गोठविण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. निवडणूक आयोगाला अण्णाद्रमुकच्या दोन पानांचे चिन्ह गोठविण्याचा निर्देश देण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. सरन्यायाधीश एन.व्ही. रमना यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने पी.एस. जोसेफ यांची ही याचिका फेटाळली आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
उच्च न्यायालयाने जोसेफ यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावत त्यांची याचिका फेटाळली होती. माझी याचिका केवळ फेटाळण्यात आली नाही तर दंडही ठोठावण्यात आल्याचे याचिकाकर्त्याने सुनावणीदरम्यान म्हटले होते. यावर सरन्यायाधीशांनी आम्ही किती दंड ठोठावावा अशी प्रश्नार्थक टिप्पणी केली. एडापड्डी के. पलानिसामी आणि ओ. पन्नीरसेल्वम यांच्यातील वाद संपेपर्यंत अण्णाद्रमुकचे निवडणूक चिन्ह गोठविण्याची मागणी पी.ए. जोसफ यांनी याचिकेद्वरो केली होती. अण्णाद्रमुकचे नेतृत्वाप्रकरणी बुधवारी मद्रास उच्च न्यायालयाने 23 जून रोजीची जैसे थे स्थिती ठेवण्याचा आदेश दिला आहे. तसेच पलानिसामी यांना अंतरिम महासचिव म्हणून निवडण्याच्या 11 जुलै रोजीच्या निर्णयाला अवैध ठरविले आहे. पलानिसामी यांना मागील महिन्यातच अंतरिम महासचिव पदावर नियुक्त करण्यात आले होते. याचबरोबर पक्षासाठीचे सर्व अधिकार त्यांना देण्यात आले होते. याच्या विरोधात ओ. पन्नीरसेल्वम यांच्या गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कायद्यांचे उल्लंघन करत महासचिव पदाची निवडणूक घेण्यात आल्याने ती रद्दबातल ठरविण्यात यावी असे युक्तिवाद त्यांच्याकडून करण्यात आला होता.