भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पंडय़ाकडे, यावर्षी होणाऱया वनडे वर्ल्ड कप तयारीवर यजमानासह ऑस्ट्रेलियन संघाचेही लक्ष

मुंबई : भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आज शुक्रवारपासून सुरुवात होत असून हार्दिक पंडय़ाचे नेतृत्व कौशल्य आणि मायदेशात होणाऱया वर्ल्ड कपची झालेली एकंदर तयारी यावर भारताचे लक्ष केंद्रित असेल. दुपारी 1.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार असून त्याचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरून केले जाईल. कौटुंबिक कारणासाठी नियमित कर्णधार रोहित शर्मा वानखेडे स्टेडियमवर होणाऱया या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याने हार्दिक त्याच्या जागी संघाचे नेतृत्व करणार आहे. टी-20 मध्ये नियमित कर्णधारपद भूषविणाऱया हार्दिकचा हा सामना कर्णधार म्हणून पहिला सामना आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकल्यानंतर तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठल्यानंतर संघाचे आता वनडे क्रिकेटकडे लक्ष केंद्रित झाले असून वर्ल्ड कपची तयारी यावर जास्त फोकस असेल. भारतातच ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे.

भारताने यापूर्वी 2011 मध्ये वनडे वर्ल्ड कपचे आयोजन केले होते आणि धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने त्या स्पर्धेत जेतेपदही पटकावले होते. त्याची पुनरावृत्ती यावर्षी रोहित शर्माची टीम इंडिया पुन्हा एकदा करेल, अशी अपेक्षा केली जात आहे. अपेक्षा तशा वाढलेल्याच असणार आहेत. कारण फॉरमॅट कोणताही असला तरी मायदेशात भारतीय संघ वाघ असतो, हे आजवर सिद्ध झालेले आहे. याशिवाय आयसीसीच्या स्पर्धांत बाद फेरी गाठूनही चांगले प्रदर्शन होत नाही, हे त्यांच्या मानगुटीवर बसलेले भूतही या संघाला त्रास देत आहे. त्यामुळे नकोशी असलेली ही परंपरा खंडित करण्यासाठी भारतीय संघ आतुर झाला आहे. या वर्षी मायदेशातील वनडेमध्ये भारताने चांगली सुरुवात केली असून त्याचा लाभ उठवायचा प्रयत्न हा संघ करेल. लंका व न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या दोन मालिकांतील सहाही सामने भारताने जिंकले आहेत. सहा सामन्यात 3 शतकांसह 113.40 च्या सरासरीने 567 धावा जमविणाऱया शुबमन गिलने या वर्ल्ड कप वर्षाची शानदार सुरुवात केली आहे. त्यामुळे या सामन्यात शर्माच्या गैरहजेरीत त्याच्यावर जास्त प्रकाशझोत असेल. याशिवाय गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटीतही शतक नोंदवले आहे. स्टार फलंदाज विराट कोहलीचा बॅड पॅचही आता मागे पडला असून 6 वनडे सामन्यात त्याने 67.50 च्या सरासरीने 338 धावा केल्या आहेत. त्यामुळे या मालिकेत 75 आंतरराष्ट्रीय शतकांत तो आणखी भर घालेल, अशी अपेक्षा आहे. त्याची ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर ऍडम झाम्पाविरुद्ध जुगलबंदी पाहण्यासारखी ठरेल. कारण झाम्पाने कोहलीविरुद्ध अनेकदा यश मिळविले आहे.

बुधवारी नेटमधील सरावावेळी कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल यांनी गोलंदाजी केली. दोघे लेगस्पिनर्स भारताच्या भात्यातील महत्त्वाचे अस्त्र ठरणार असून व्हाईटबॉल क्रिकेटमध्ये त्यांचे रेकॉर्ड चांगले आहे आणि बळी मिळविण्याचे त्यांचे कसब भारतासाठी उपयोगी ठरणार आहे. 5 सामन्यात 11 बळी मिळवित कुलदीपने स्पिनर्समध्ये सर्वोत्तम कामगिरी केली तर वेगवान गोलंदाजांत सिराजने तितक्याच सामन्यात इतरांपेक्षा सरस कामगिरी करीत 14 बळी मिळविले आहेत. ऑस्ट्रेलियन संघात विजय खेचून आणण्याची क्षमता असणारे अनेक खेळाडू आहेत, याची भारताला पुरेपूर जाणीव आहे. नियमित कर्णधार कमिन्सची गैरहजेरी त्यांना जाणवणार असली तरी तेही वर्ल्ड कपसाठी अंतिम संघ निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून या मालिकेकडे पाहत आहेत. दोन कसोटीनंतर वनडे मालिकेतही स्मिथ संघाचे नेतृत्व करेल. डेव्हिड वॉर्नर व अष्टपैलू ऍस्टन ऍगर कसोटी मालिकेवेळी मायदेशी परतले होते. पण वनडे मालिकेसाठी ते पुन्हा संघात सामील झाले आहेत. गेल्या साडेतीन महिन्यात ऑस्ट्रेलियाने एकही वनडे सामना खेळलेला नाही. त्यांनी पूर्णपणे डब्ल्यूटीसी अंतिम फेरी गाठण्यावर लक्ष केंद्रित केले होते. त्यांचे हे उद्दिष्ट साध्य झाले असल्याने आगामी आव्हानांची तयारी करण्यासाठी ते आता सज्ज झाले आहेत. मागील वेळी येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 10 गडय़ांनी विजय मिळविला होता, याचा त्यांना मानसिक लाभही मिळू शकतो. त्या सामन्यात वॉर्नर व फिंच यांनी नाबाद शतके झळकवली होती.
संभाव्य संघ
भारत : हार्दिक पंडय़ा (कर्णधार), गिल, कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन, जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, चहल, शमी, सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, जयदेव उनादकट.
ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), वॉर्नर, हेड, लाबुशेन, मार्श, स्टोईनिस, कॅरे, मॅक्सवेल, ग्रीन, जोश इंग्लिस, सीन ऍबॉट, ऍगर, स्टार्क, नाथन एलिस, झाम्पा.
सामन्याची वेळ : दुपारी 1.30 पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क.