रोहित शर्माचे पुनरागमन जवळपास निश्चित, विराट, बुमराह-जडेजाच्या गैरहजेरीत अन्य खेळाडूंना संधी
साऊदम्प्टन / वृत्तसंस्था
अल्ट्रा-ऍग्रेसिव्ह इंग्लंडविरुद्ध आज (दि. 7) होणाऱया पहिल्या टी-20 सामन्यासाठी मैदानात उतरताना भारतीय संघ आगामी वर्ल्डकपच्या दिशेने अंतिम जडणघडण करण्यावर भर देणे अपेक्षित आहे. कोरोनामुळे पाचवी कसोटी खेळू न शकलेला भारतीय कर्णधार रोहित शर्मा येथे संघात दाखल झाला असून तो नेहमीप्रमाणे सलामीला फलंदाजीला उतरणे क्रमप्राप्त आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, ही लढत रात्री 10.30 वाजता होणार आहे.
विराट कोहली, जसप्रित बुमराह, रविंद्र जडेजा, श्रेयस अय्यर व रिषभ पंत हे कसोटी संघातील खेळाडू येथील पहिल्या टी-20 लढतीत खेळणार नाहीत. मालिकेतील दुसऱया सामन्यासाठी ते संघात दाखल होणार आहेत.
या खेळाडूंच्या गैरहजेरीत ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन यांना संघात स्थान मिळणार का, हे पहावे लागेल. ऋतुराज व संजू सॅमसनला ऑस्ट्रेलियातील विश्वचषक स्पर्धेतील संभाव्य खेळाडूत संधी मिळण्याची शक्यता कमीच असली तरी येथे संधी मिळाल्यास ते आपले नाणे खणखणीत वाजवण्यासाठी निर्धाराने प्रयत्न करणे अपेक्षित आहे. यापूर्वी आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांमध्ये ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे सलामीला येऊ शकला नव्हता आणि येथे रोहित अंतिम संघात समाविष्ट असल्यास गायकवाडला पुन्हा एकदा राखीव खेळाडूंमध्येच बसावे लागेल.

इशान किशनने आतापर्यंत मिळालेल्या संधीचे सोने करण्यात बहुतांशी वेळी यश मिळवले असून आताही तो राखीव सलामीवीर म्हणून आपली जागा भक्कम करण्यासाठी कसोशीने प्रयत्नशील असेल. या मालिकेतील दुसऱया सामन्यात विराट कोहली नेहमीच्या वन-डाऊन पोझिशनवर फलंदाजीला उतरेल. त्या पार्श्वभूमीवर, हुडा येथील पहिल्या सामन्यात दमदार प्रदर्शन साकारण्यासाठी महत्त्वाकांक्षी असेल. यापूर्वी आयर्लंडविरुद्ध मालिकेत त्याने एक शतक व नाबाद 47 असे लक्षवेधी डाव साकारले आहेत.
राहुल त्रिपाठी व अर्शदीप सिंग यांचा दुसऱया व तिसऱया टी-20 सामन्यासाठी संघात समावेश नाही. येथे पहिल्या लढतीतही अंतिम एकादशमध्ये त्यांना खेळवले जाणार का, याबद्दल साशंकता आहे. दुखापतीवर मात करुन आयर्लंडविरुद्ध मालिकेत संघात परतलेल्या सूर्यकुमार यादवला मॅलाहिदेत खेळता आले नव्हते. येथे ती कसर भरुन काढण्याचा त्याचा प्रयत्न असेल. गत आठवडय़ात डर्बेशायरविरुद्ध सराव सामन्यात तो व हुडा उत्तम बहरात दिसून आले.
गोलंदाजीच्या आघाडीवर, जलदगती गोलंदाज उमरान मलिक अचूकता वाढवण्यासाठी प्रयत्नशील असेल. आयर्लंडविरुद्ध डावातील शेवटच्या षटकात 17 धावांचे संरक्षण करण्यात तो यशस्वी झाला होता. अनुभवी भुवनेश्वर कुमार व हर्षल पटेल यांची आयरिश फलंदाजांनी बरीच धुलाई केली होती. तो हिशेब चुकता करण्याचे या उभयतांचे प्रयत्न असतील. अंतिम एकादशमध्ये रवि बिश्नोईऐवजी यजुवेंद्र चहलला संधी मिळण्याचे संकेत आहेत.
संभाव्य संघ
इंग्लंड ः जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम करण, रिचर्ड ग्लेसन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, तिमल मिल्स, मॅथ्यू पार्किन्सन, जेसॉन रॉय, फिल सॉल्ट, रीस टॉपली, डेव्हिड विली.
भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, वेंकटेश अय्यर, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
सामन्याची वेळ ः रात्री 10.30 वाजता.
ऑस्ट्रेलियातील वर्ल्डकपपूर्वी भारताचे 16 टी-20 सामने
यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियन भूमीत खेळवली जाणार असून त्यापूर्वी भारतीय संघ साधारणपणे 16 टी-20 सामने खेळेल. यात इंग्लंडविरुद्ध सध्याच्या मालिकेत 3, विंडीजविरुद्ध 5 (29 जुलै ते 7 ऑगस्ट), आशिया चषक स्पर्धेत (ऑगस्ट-सप्टेंबर) 5 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध (सप्टेंबर) 3 टी-20 लढतींचा समावेश आहे.
इंग्लंडसाठी जोस बटलर पर्वाचा प्रारंभ

जागतिक स्तरावरील दर्जेदार खेळाडू इयॉन मॉर्गनने निवृत्ती जाहीर केल्यानंतर या मालिकेच्या माध्यमातून इंग्लिश संघासाठी बटलर पर्वाची सुरुवात होत आहे. अष्टपैलू बेन स्टोक्स आणि भारताविरुद्ध पाचव्या कसोटी सामन्यातील हिरो जॉनी बेअरस्टो यांना मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, या दिग्गज खेळाडूंच्या गैरहजेरीतही यजमान संघाला कमी लेखून चालणार नाही, असे चित्र आहे. जोस बटलर व लियाम लिव्हिंगस्टोन यांनी अलीकडेच संपन्न झालेल्या आयपीएल स्पर्धेत आपला पॉवर गेम दाखवून दिला असून हीच घोडदौड ते या मालिकेतही कायम राखण्यासाठी महत्त्वाकांक्षी असणार आहेत.