राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे जे निकाल आले आहेत त्यामुळे विविध पक्ष हुरळलेले आहेत. आम्हीच सर्वात मोठा पक्ष आहोत असे दावे-प्रतिदावे करत सहकाऱयांना पेढे भरवू लागले आहेत. बऱयाच आमदारांनी आपले किल्ले शाबूत ठेवले आहेत. पण निवडणुकीचे अंतरंग वेगवेगळे आहे. सुमारे 7759 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. या निवडणुकांचे वैशिष्टय़ म्हणजे या निवडणुकीत कोठेही मोठा हिंसाचार झाला नाही. अनेक ठिकाणी नवे चेहरे निवडून आले. यंदाची सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून होती. ओघानेच या पदासाठी मोठी चुरस होती. स्थानिक स्वराज्य संस्थात आता ग्रामपंचायतीला आणि सरपंचांना पूर्वीपेक्षा अधिक अधिकार आणि निधी उपलब्ध होतो आहे. सरपंचपद हे केवळ मानाचे नव्हे तर अधिकाराचे बनले आहे. ओघानेच या पदासाठी या निवडणुकीत मोठी चुरस होती. या निवडणुकीचे वैशिष्टय़ म्हणजे निवडणुकीपूर्वी राज्यात सत्तांतर झाले होते व शिंदे-फडणवीस सरकार सत्तारुढ झाले होते. सहा महिन्यात या सरकारने केलेल्या कामाला आणि राजकीय पक्षात झालेल्या फाटाफुटीला राज्यातील जनता कसा कौल देते याची उत्सुकता होती. तोंडावर असणाऱया मुंबई-औरंगाबाद व अन्य महापालिकांच्या निवडणुकीचा अंदाज यातून लागू शकणार होता. त्यामुळे ही निवडणूक महाराष्ट्राची निवडणुकीची लिटमस टेस्ट मानली जात होती. खरे तर ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षीय पातळीवर व निवडणूक चिन्हावर लढवल्या जात नाहीत. स्थानिक आघाडय़ा, गावपातळीवरचे गट, जात, पात, धर्म, भावकी, मतपेटय़ा आणि त्यांचे हिशोब असे अनेक कंगोरे या निवडणुकीला असतात. पण उभा राहिलेला उमेदवार कोणत्या पक्षाचा, नेत्याचा हे स्थानिक पातळीवर सर्वांना माहिती असते. सर्वच निवडणुकांना आचारसंहिता असते. ग्रामपंचायत निवडणुकांना पण ती असते. पण या आचारसंहितेला सोयीने बगल देत आपले हेतू कसे साध्य करायचे याचे गणित आता सर्वांना ज्ञात झाले आहे. राज्यभर सर्व हॉटेल्स, बार, धाबे यात गेले काही दिवस जी अभूतपूर्व गर्दी झाली होती आणि दारुचा जो खप झाला त्यांची आकडेवारी तपासली तरी निवडणूक कोणत्या साधनाने जिंकता किंवा लढता येते हे स्पष्ट होईल. जगातील सर्वांत मोठी व प्रदीर्घ काळ असलेली लोकशाही म्हणून भारतीय लोकशाहीचा गौरव होतो पण या लोकशाहीचे अंतरंग ग्रामीण पातळीपर्यंत कसे कार्यरत आहे हे बघितल्यावर मन चिंतीत होते. वरवर निवडणूक पाहता प्रत्येक आमदाराने आपला किल्ला सांभाळला असे दिसते आहे. जिथे राष्ट्रवादीचा आमदार तेथे राष्ट्रवादीची सरशी आणि जेथे भाजपाचा आमदार तेथे भाजपाची सरशी शिवसेनेतून उद्धव ठाकरेंचे नेतृत्व झुगारुन बाहेर पडलेले आमदार कसे यश मिळवतात हा उत्सुकतेचा विषय होता. पण त्यांनीही आपले किल्ले राखले आहेत. ओघानेच सत्तारुढ भाजप-शिंदे गटाची सरशी झाली आहे आणि राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना यानाही यश आले आहे. अपक्षही मोठय़ा संख्येने आहेत. या निवडणुकीत निवडून येणाऱया ग्रामपंचायत सदस्यांची संख्या पासष्ठ हजारपेक्षा जास्त होती आणि चौदा हजार पेक्षा जास्त सदस्य बिनविरोध विजयी झाले आहेत. विजयी सदस्य आणि सरपंच तरुण आहेत. महिलांची संख्याही तगडी आहे. पासष्ठ हजार ही लहान संख्या नाही. या तरुण, सुशिक्षित आणि स्वप्ने घेऊन आलेल्या मंडळींनी खरोखर ग्रामविकासाचा ध्यास घेतला तर महाराष्ट्राचे चित्र बदलू शकते. राज्यात ग्रामीण भागात आज अनेक प्रश्न आ वासून आहेत. शेती, शेतकरी, रोजगार, चांगले शिक्षण, पर्यावरण यासह जात, पात, धर्म यावरुनच मतभेद असे अनेक विषय ऐरणीवर आहेत. ग्रामीण भागातील शाळा, तेथे मिळणारे शिक्षण, खेडय़ातून शहराकडे होणारे स्थलांतर, नदी, पाणी, हवा, माती प्रदूषण, बदललेला निसर्ग, ढगफुटी, पूर, महापूर, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या असे अनेक विषय आहेत. या नव्या सरपंचांनी आणि सदस्यांनी या कामासाठी योगदान दिले. एक दबावगट तयार केला आणि महात्मा गांधींचे ‘ग्रामराज्य रामराज्य’ खेडय़ाकडे चला संदेश आचारला तर उद्या महाराष्ट्राचे चित्र वेगळे दिसेल. कोणत्याही राजकारणापेक्षा आणि नेता वा पक्षापेक्षा हे काम मोठे व महत्त्वाचे आहे. नवीन तरुण सदस्यांनी त्यात लक्ष घातले पाहिजे. निवडणूक, मतदान आणि निवडणूक जिंकण्यासाठीच्या कार्यपद्धती गाव-वस्तीपर्यंत कशा स्वरुपात पोहचल्या आहेत हे या निवडणुकीत प्रकर्षाने जाणवले. धाबे, जेवणे आणि लक्ष्मीदर्शन या जीवावर निवडणुका जिंकता येतात हे सूत्र अधिक ठळक होते आहे. त्याच जोडीला परंपरागत पाया असलेला काँग्रेस पक्ष ग्रामीण भागातून उखडला जाताना दिसतो आहे. काँग्रेस नेतृत्व अनेक पातळीवर कमी पडते आहे. काँग्रेस आमदारांचे संख्याबळही कमीच आहे. आगामी काळात काँग्रेसमध्य़े फूट पडून काँग्रेसचे आमदार अन्य पक्षाच्या वळचणीला गेले तर आश्चर्य वाटायला नको. ग्रामपंचायत निवडणुकीची जी लिटमस झाली त्यामध्ये सत्तारुढ भाजप-शिंदे गटाची सरशी झाली असली आणि शिंदे-फडणवीस यांना विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण यासह सर्वत्र बरे यश मिळाले असले तरी या निवडणुकीमुळे राज्यातील जनतेचा संपूर्ण कौल आपणास आहे. या भ्रमात या युतीने राहू नये. राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीनेही बरे यश मिळवले आहे. उद्याच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काटय़ाची निवडणूक होणार हे वेगळे सांगायला नको. ग्रामपंचायती पाठोपाठ आता महापालिका निवडणुका होतील. मुंबई महापालिका निवडणूक लक्षवेधी ठरेल. शिवसेनेची तेथील सत्ता उखडून काढण्यासाठी भाजपा पूर्ण ताकद लावेल. ओघानेच ही निवडणूक व तिचा निकाल उत्सुकतेचा विषय व्हावा पण राजकीय पक्ष निवडणुका कशा लढवतात, जिंकतात यांचे ट्रेलर ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आले आहे. ही कार्यपद्धती फारशी शोभादायक नाही. लोकप्रतिनिधींनी खरे तर लोकांचे प्रश्न आणि राज्याचा विकास यांना भिडले पाहिजे पण पक्ष फोडणे, सत्ता राखणे, वैध-अवैध मार्गाने निवडणुका जिंकणे हीच धन्यता ठरत आहे. तूर्त आमदारांनी आपआपले बालेकिल्ले शाबूत राखले इतकेच सत्य आहे. विजयी सरपंच आणि सदस्य ग्रामसुधारणेत आणि विकासात योगदान देतील अशी अपेक्षा आहे. त्यांना चांगल्या कामासाठी शुभेच्छा.
Previous Articleतवांग प्रश्नावर पुन्हा संसदेत गदारोळ
Next Article 10,505 हत्या, 97 वर्षीय नाझी टायपिस्ट दोषी
Related Posts
Add A Comment