कन्नडिंगांनी कोकणी फलकांना काळे फासले, कोकणी स्वाभिमानी नागरिकांकडून निषेध
प्रतिनिधी /काणकोण
गोव्याच्या शेजारच्या कारवार भागात कोकणी आणि कन्नड भाषांच्या वादाला वेगळेच वळण लागले असून या प्रांतातील काही भागात जे कोकणी फलक लावण्यात आले होते त्या फलकांना काळे फासण्याचा प्रकार कन्नडिंगा संघटनेकडून घडला. या प्रकाराचा कोकणी स्वाभिमानी नागरिकांनी तीव्र निषेध करतानाच 17 रोजी सकाळी 10 वा. कारवारच्या जिल्हाधिकाऱयांना यासंबंधीचे एक निवेदन देऊन कारवारमध्ये कोकणीची सक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्याचे ठरविले आहे.
कारवार प्रांतात मागच्या कित्येक शतकांपासून कोकणी बोलली जात आहे. या ठिकाणचा सर्व व्यवहार कोकणीतून चालत असताना मेंगलोरला ज्या संघटनेचे कार्यालय आहे त्या संघटनेच्या काही प्रतिनिधींनी कारवार भागात ज्या ज्या ठिकाणी कन्नड आणि कोकणीतून फलक लावण्यात आले होते त्यातील कोकणी फलकांवर काळी शाई फासली आणि कन्नड भाषेचा जयजयकार करतानाच कन्नड भाषेवरील अन्याय खपवून घेतल्या जाणार नसल्याच्या घोषणा दिल्या. ज्या लोकांकडून हा घृणास्पद असा प्रकार घडलेला आहे त्यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिकत आहेत. त्यांच्या घरात तुळू भाषा बोलली जाते, असा स्पष्ट आरोप कोकणी स्वाभिमानी नागरिकांनी केला आहे.
भाषांमध्ये वाद उकरून काढून या ठिकाणी भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रकार होत आहे. या प्रकारात ज्या संघटना गुरफटल्या आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कोकणी स्वाभिमानी नागरिकांनी केली आहे. 17 रोजी कारवारच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ बहुसंख्येने कोकणी स्वाभिमानी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कोकणी स्वाभिमानी नागरिक संघटनेने केले आहे.