जगातील सर्वात मोठे मानले गेलेले मत्स्यालय फुटल्याने जर्मनीत काहीकाळ एकच हाहाकार माजला आहे. या देशाची राजधानी बर्लिन येथील रेडिसन ब्ल्यू नामक हॉटेलचे हे मत्स्यालय होते. त्यात विविध प्रकारचे रंगीबेरंगी हजारो मासे सुखनैव संचार करत होते. पण सगळे पाणी वाहून गेल्याने त्या बिचाऱया माशांवर जीव गमावण्याची वेळ आली. हे हॉटेल महामार्गाशेजारीच असल्याने मत्स्यालयातील लक्षावधी लीटर पाणी महागार्मावर येऊन जणू काही सुनामी अवतरल्याची परिस्थिती निर्माण झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही माणसाचा मृत्यू झाला नाही. पण दोघेजण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. हे मत्स्यालय केवळ या हॉटेलचेच नव्हे, तर बर्लिन शहराचेच अनोखे वैशिष्टय़ होतें. ते इतिहासजमा झाले.
त्याचे नाव ऍक्वाडोम असे होते. त्याची उंची 15.85 मीटर तर रुंदी अधगोलाकार आकारात 100 मीटरहून अधिक होती. ते पूर्णतः काचेचे बनविण्यात आले होते. ते कशामुळे फुटले हे अद्याप नेमकेपणाने स्पष्ट झालेले नाही. पण हा अपघातच आहे असे प्रथमदर्शनी दिसत आहे. हा घातपात नसावा असे तपास यंत्रणांचे म्हणणे असले तरी सर्व शक्यता गृहित धरुन तपास कार्य सुरु आहे.

या मत्स्यालयात एकंदर 2 लाख 64 हजार 172 गॅलन, म्हणजे साधारणतः 10 लाख लीटर पाणी मावत होते. त्याच्या काचेच्या भिंती फुटल्याने हे सर्व पाणी आजूबाजूच्या मार्गांवर सांडल्याने त्यावरुन प्रवास करणाऱया नागरीकांची अनेक तास कोंडी झाली होती. ही घटना अत्यंत क्लेषदायक आणि हानीकारक आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तपास कार्य सुरु झाले असून मत्स्यालय फुटण्यासाठी कोणती कारणे घडली असावीत हे शोधून काढण्यासाठी तज्ञांचे साहाय्य घेतले जात आहे. या दुर्घटनेत 1,500 छोटे मोठे मासे जागेवरच मृत झाले. या मत्स्यालयाच्या छोटय़ा टाक्यांमध्ये असलेले मासे अद्याप जिवंत आहेत कारण या टाक्या फुटलेल्या नाहीत. आता या माशांना वाचविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण एकंदर या घटनेमुळे बर्लिनची शान नाहीशी झाली, अशी लोकभावना आहे. मत्स्यालय फुटले तेव्हा अक्षरशः भूकंप झाल्यासारखा आवाज झाल्याने जवळपास राहणारे अनेक नागरीक घाबरुन घराबाहेर पडले होते.