पुणे / प्रतिनिधी :
मराठवाडय़ातील मराठा समाजाचा इतर मागासवर्गात समावेश करणे व 1 मे 1960 पासून आजपर्यंतच्या शैक्षणिक, नोकऱ्यांतील अनुशेष भरावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली असून, मराठवाडय़ातील मराठा समाज कुणबी असल्याचे पुरावे उद्या (सोमवारी, दि. 12) पुणे येथे राज्य मागासवर्ग आयोगासमोर सादर करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने एक मताने घेतला आहे, अशी माहिती छावा मराठा संघटनेचे संस्थापक किशोर चव्हाण आणि छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी दिली.
आयोगासमोर ठोस पुरावे सादर करण्यासाठी मराठा संघटना व मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत असे सांगितले, की मराठवाडा हा आधी आंध्र प्रदेशचा भाग होता. त्यावेळी मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश होता. आजही आंध्र प्रदेशमध्ये मराठा समाज ओबीसीत आहे. त्या काळातील एससी, एसटी, ओबीसींचा मात्र त्या प्रवर्गात समावेश केला आहे. आम्ही ओबीसी समावेशाची मागणी करीत नसून, आमच्या हक्काचे आरक्षण द्या, अशी आमची भूमिका आहे. आज मराठवाडा आंध्रप्रदेशमध्ये असता, तर आम्हाला ओबीसी समाजामध्ये आरक्षण मिळाले असते. मराठा समाज बांधवांकडे काही माहिती असल्यास ती द्यावी, असे आवाहन किशोर चव्हाण आणि रामभाऊ जाधव यांनी केले आहे.
अधिक वाचा : लव्ह जिहाद प्रकरण भोवलं, नवनीत राणांवर गुन्हा दाखल
या बैठकीला राजेंद्र दाते पाटील, विनोद पाटील, धनंजय पाटील, अभिजीत देशमुख, सुरेश वाकडे, शिवप्रहारचे सरचिटणीस प्रशांत इंगळे, रेखा वहाटुळे, सुवर्णा मोहिते आदी उपस्थित होते.