प्रत्येक फ्लॅटमध्ये राहतो चोर अन् मारेकरी
घर एक अशी जागा आहे, जेथे माणसाला सर्वात सुरक्षित वाटत असते. परंतु हे घर जर जगातील सर्वात धोकादायक ठिकाणांपैकी एक असेल तर काय? जगातील एका अपार्टमेंटला सर्वात धोकादायक इमारत म्हणून ओळखले जाते. याहून अधिक असुरक्षित अपार्टमेंट तुम्हाला कुठेच मिळणार नाही.
पश्चिम लंडनच्या विलो ट्री लेन या इमारतीचा इतिहास गुन्हय़ांच्या उच्च पातळीशी निगडित आहे. या भागाला जगातील सर्वात धोकादायक रियल इस्टेटमध्ये गणले जाते. याच्या आसपास राहणारे लोक देखील रात्रीच्या वेळी या ठिकाणानजीक जाणे टाळतात. या इमारतीचा इतिहास आणि येथील रहिवाशांबद्दल जाणून घेतल्यावर कुणीही येथे राहण्यास घाबरेल. या इमारतीत केवळ गुन्हेगारच राहत असल्याचे बोलले जाते.

चालू वर्षातील केवळ तीन महिन्यांमध्ये या भागात सुमारे 463 गुन्हे घडले आहेत. हे सर्व गुन्हे या इमारतीच्या एक मैलाच्या कक्षेत घडले आहेत. याचमुळे परिसरात राहणाऱया लोकांनीही भीती व्यक्त केली आहे. एका इमारतीमुळे पूर्ण भागात भीतीचे वातावरण असल्याचे या लोकांचे म्हणणे आहे. या भागात कुणीच काळोख पडल्यावर येऊ इच्छित नाही.
बाजारपेठेला फटका
या भागात हार्दिक पटेल हे अनेक वर्षांपासून दुकान चालवत होते. परंतु आता त्यांच्यासाठी हे शक्य राहिलेले नाही. या अपार्टमेंटमध्ये राहणारे गुन्हेगार त्यांच्या दुकानात येतात आणि पैसे न देताच सामग्री उचलून नेतात. या गुन्हेगारांना कुणीच विरोध करू शकत नाही. तर एका 67 वर्षीय महिलेने आपण आता घरातून बाहेरच पडत नसल्याचे सांगितले आहे.