वार्षिक शुल्क 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक
लहान मुलांचे भविष्य त्याला मिळणाऱया प्रारंभिक शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रामुख्याने अवलंबून असते. याचमुळे अनेक देशांमध्ये उच्चशिक्षणाच्या तुलनेत मुलांच्या प्रारंभिक शिक्षणावर अधिक भर दिला जातो. शाळेत मुलांना जे शिकविण्यात येते, ते व्यावहारिक जीवनात सर्वात अधिक उपयुक्त पडते. स्वतःच्या मुलामुलींनी अत्यंत चांगल्या शाळेत शिकावे असे सर्वच पालकांना वाटत असते.
जगातील सर्वात महागडी शाळा भारतात नव्हे तर स्वीत्झर्लंडमध्ये आहे. या शाळेची स्थापना 1910 मध्ये करण्यात आली होती. या शाळेच्या स्थापनेचे शेय मॅडम फ्लुएट फेरियर यांना दिले जाते. या शाळेचे नाव इन्स्टीटय़ूट ऑफ डेम रोसेनबर्ग, सेंट गॅलेन आहे. ही एक खासगी वसतीशाळा असून तेथे 50 देशांमधील विद्यार्थी शिकत आहेत. या शाळेचे प्रवेश शुल्क अत्यंत अधिक असल्याने कोटय़धीश देखील स्वतःच्या मुलांना येथे शिकविण्याच्या विचारापासून मागे हटतात. या शाळेचे एकूण वार्षिक शुल्क 1 कोटी 33 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. द टेलिग्राफ आणि साउथ चायना मॉर्निंग पोस्टने देखील या शाळेला जगातील सर्वात महागडी शाळा ठरविले आहे. या शाळेत प्रेंच आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये शिक्षण दिले जाते.

जगातील दुसऱया क्रमांकाची महागडी शाळा स्वीत्झर्लंडमध्येच आहे. या शाळेचे नाव इन्स्टीटय़ूट ले रोजी आहे. या शाळेचे वार्षिक शुल्क 1 कोटी 7 लाखाहून अधिक आहे. या शाळेत एकूण 420 मुले शिकत असून त्यांच्याकडून एकूण 150 शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.
या दोन्ही शाळांमध्ये शिक्षणासह एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजवर देखील अधिक लक्ष दिले जाते. या शाळेत इनडोअरसोबत आउटडोअर ऍक्टिव्हिटी देखील मुलांना प्राप्त होते, यात विदेशी प्रवास देखील सामील आहे. या शाळांमध्ये जगभरातील शैक्षणिक सहलींसह कौशल्य आधारित कार्यक्रम आणि रोजगाराच्या पूर्ण संधी उपलब्ध केल्या जातात. या दोन्ही शाळांचा परिसर अत्यंत आकर्षक असून तेथे विद्यार्थ्यांसाठी सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत.