आप्पाचीवाडी-कुर्लीत भाविकांची अलोट गर्दी ःभंडाऱयाची उधळण
वार्ताहर/ कोगनोळी
कर्नाटक-महाराष्ट्रासह अन्य राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आप्पाचीवाडी-कुर्ली (ता. निपाणी) येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेची शनिवारी मानकरी, पुजारी व भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली??. गेल्या पाच दिवसापासून सुरु असणाऱया या यात्रेत नाथांचे अनेक धार्मिक कार्यक्रम, ढोलवादन, वालंग, गजनृत्य, हेडाम खेळणे असे विविध कार्यक्रम पार पडले.
शुक्रवारी पहाटे नाथांची पहिली भाकणूक तर शनिवारी पहाटे नाथांची दुसरी भाकणूक सिद्धार्थ डोणे यांनी कथन केली. त्यानंतर सकाळी 7 वाजता घुमट मंदिरात तिसरी अखेरची भाकणूक झाली. गेल्या पाच दिवसात यात्रेसाठी व भाकणूकीसाठी मोठय़ा प्रमाणात भाविकांनी हजेरी लावली होती. शुक्रवारी दिवसभर महानैवेद्याचा कार्यक्रम झाला.
यावेळी पारंपरिक पद्धतीने सायंकाळी 5 वाजता उत्सवस्थळी ढोलवादन व भंडाऱयाची उधळण करण्यात आली. त्यानंतर नाथांच्या दोन्ही पालख्यांची व सबिण्याची श्री हालसिद्धनाथ व श्री महालक्ष्मी मंदिर प्रदक्षिणा झाली. सायंकाळी 6 वाजता वाडय़ातील मंदिरात नाथांची मूर्ती स्थानापन्न झाली. त्यानंतर कुर्लीतील पालखी सोहळा मार्गस्थ झाला. तत्पूर्वी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास डोणे महाराज यांच्या हस्ते प्रमुख मानकऱयांच्या उपस्थितीत कर तोडून पाच दिवस सुरु असलेल्या यात्रेची उत्साहाने सांगता करण्यात आली.ग्रामपंचायत प्रशासन, यात्रा कमिटी, पोलीस प्रशासन यांच्या नियोजनामुळे यात्रा व यात्रेतील धार्मिक विधी सुरळीत पार पडल्याने समाधान व्यक्त होत आहे.