The performance of the Sindhudurg police force in the Anganwadi is appreciated by the ‘IG’
लाखोंच्या जनसमुदायावर नियंत्रण ; चोरी, पाकीटमारी असे प्रकारही यावर्षी नाहीत ; पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या पाठीवरही आयजींची थाप
आंगणेवाडी यात्रोत्सवास यावर्षी अपेक्षेप्रमाणे रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली. पहिल्यांदाच दोन दिवस यात्रोत्सवास सुरू होता. लाखोंच्या जनसमुदायात यात्रा संपन्न झाली. गर्दी नियंत्रण, कोणताही अनुचित प्रकार नाही, चोरी, पाकीटमारी असे प्रकारही घडले नाहीत. याचे श्रेय योग्य प्रकारे पोलीस बंदोबस्त नियोजन करून दिवसरात्र सेवा बजावणाऱ्या सिंधुदुर्ग पोलीस दलाचे सर्वांनी कौतुक केले.दरम्यान, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजी) प्रवीण पवार यांनी सिंधुदुर्ग पोलीस दलाचे कौतुक करत मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या पाठीवरही कौतुकाची थाप दिली आहे.
दोन वर्षे कोरोना निर्बंधा नंतर यावर्षी आंगणेवाडी यात्रोत्सवात मोठी गर्दी होणार या अपेक्षेने आंगणेवाडी मंडळ, जिल्हा प्रशासन व पालकमंत्री यांनी यात्रा नियोजन केले. यात्रोत्सवात केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आदी व्हीव्हीआयपी मंडळी अन्य नेतेमंडळी यांचीही उपस्थिती होती. यात्रेपासून काही अंतरावर भाजपचा मेळावा संपन्न झाला. एकूणच आंगणेवाडी यात्रोत्सव यावर्षी महा इव्हेंट ठरला. मात्र यात्रा यशस्वीतेसाठी या सर्वाचे नियोजन पोलीस प्रशासनाने आंगणे ग्रामस्थांच्या सहकार्याने सुयोग्य पद्धतीने केले.
कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजी) प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शननाखाली पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड अशी ४०० जणांची टीम आंगणेवाडी यात्रोत्सवात सेवेत होती. स्थानिक पोलीस ठाणे मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव व सर्व टीम, सर्व अधिकारी यांच्या एकत्रित सेवेतून यात्रा यशस्वी पार पडली. नेते मंडळी, भाविक अनेकांनी पोलीस प्रशासनाच्या सुयोग्य नियोजनाचे विशेष कौतुक केले.
मालवण |प्रतिनिधी