सोनियांनी माकन-खर्गे यांच्याकडे मागितला लेखी अहवाल ः नवा मुख्यमंत्री निवडीचा तिढा कायम
जयपूर / वृत्तसंस्था
काँग्रेसमधील अध्यक्षपदाची निवड आणि राजस्थानमधील नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीवरून वेगळेच ‘राजकारण’ सुरू झाले आहे. अशोक गेहलोत यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिल्याने सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवण्याची शक्मयता निर्माण झाली असतानाच गेहलोत गटाने काँग्रेस नेतृत्त्वाला आव्हान दिल्यामुळे राजकीय पेचप्रसंग अधिक तीव्र झाला आहे. गेहलोत समर्थकांनी पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास विरोध केल्यामुळे पक्षनिरीक्षकांचीही कोंडी झाली आहे. आमदारांशी चर्चा करण्यासाठी रविवारी राजस्थानमध्ये दाखल झालेले पक्षनिरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन पुन्हा दिल्लीत परतले असून आता हायकमांडनी त्यांच्याकडे लेखी अहवाल मागितला आहे.

राजस्थानमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी हालचाली गतिमान झाल्या होत्या. याचदरम्यान गेहलोत गटाने विधिमंडळ पक्षाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. आता या नाराज गटाने आपण काँग्रेस अध्यक्ष निवडीपर्यंत म्हणजेच 19 ऑक्टोबरपर्यंत कोणत्याही बैठकीत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच अन्य काही अटीही घातल्या आहेत. अध्यक्ष निवडीनंतर मुख्यमंत्री घोषित करावा, अशी त्यांची मुख्य मागणी असून नवा मुख्यमंत्री गेहलोत यांच्या पसंतीचा असावा, अशी अटही काही आमदारांनी घातली आहे.
माकन-खर्गे दिल्लीत परतले
आमदारांशी चर्चा करण्यासाठी राजस्थानमध्ये आलेले ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्ष प्रभारी अजय माकन सोमवारी दुपारी दिल्लीत परतले. दोघांनीही संध्याकाळी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्याकडे लेखी अहवालाची मागणी करण्यात आली आहे. सदर अहवाल सोनिया गांधी यांना मंगळवारपर्यंत दिला जाणार असल्याचे अजय माकन यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले. सद्यस्थितीत राजस्थानमधील आमदारांच्या कृतीबाबत सर्व माहिती हायकमांडना देण्यात आली आहे.
आमदारांच्या कृतीबाबत निरीक्षक नाराज
आमदारांनी विधिमंडळाच्या बैठकीला उपस्थित न राहणे हे अनुशासनात्मक आहे. या बैठकीदरम्यान त्यांनी स्वतः बैठक बोलावली. ही देखील अनुशासनहीनता असून त्यावर काय कारवाई करता येईल ते आम्ही पाहू. आम्ही प्रत्येक आमदारांशी स्वतंत्रपणे बोलण्याच्या विचारात होतो. पण ते एकत्रितपणे भेटण्यावर ठाम होते. तसेच त्यांनी 102 आमदारांपैकीच कुणालाही मुख्यमंत्री करण्याचा आग्रह धरला असल्याचे सांगत माकन यांनी त्यांच्या कृतीबाबत नाराजी व्यक्त केली.
कमलनाथ यांना दिल्लीतून बोलावणे
अशोक गेहलोत आणि पायलट गटामध्ये मध्यस्थी करण्यासाठी हायकमांडने माजी खासदार कमलनाथ यांना दिल्लीला बोलावले आहे. अजय माकन आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना राजस्थान हायकमांडने नवीन मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी पाठवले होते. प्रत्येक आमदाराशी स्वतंत्रपणे चर्चा करण्याची सूचना त्यांना करण्यात आली होती. मात्र गेहलोत समर्थक आमदार निरीक्षकांना भेटले नाहीत. आता पुढील निर्णय घेण्याचे आव्हान हायकमांडसमोर आहे.
अशोक गेहलोत यांची निरीक्षकांशी चर्चा
मुख्यमंत्री अशोक गेहलोत दुपारी दीडच्या सुमारास हॉटेल मॅरियटमध्ये गेले होते. त्यांनी अजय माकन आणि मल्लिकार्जुन खर्गे या निरीक्षकांची भेट घेतली. गेहलोत यांची भेट घेतल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी घडलेल्या प्रकाराची माहिती हायकमांडना दिल्याचे स्पष्ट केले. पक्षनेतृत्त्वाचा निर्णय प्रत्येकाने पाळला पाहिजे. पक्षात शिस्त असली पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले.
सचिन पायलट यांचे मौन
मुख्यमंत्रीपदाचे दावेदार समजले जाणारे सचिन पायलट यांनी सध्या एकंदर परिस्थितीबाबत उघडपणे कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगले आहे. सचिन पायलट हे सिव्हिल लाईन्स येथील आपल्या बंगल्यावर होते. याचदरम्यान खिलाडी लाल बैरवा, वेदप्रकाश सोलंकी आणि जीआर खटाना यांच्यासह काही समर्थक आमदार पायलट यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर पोहोचले होते.
नवीन मुख्यमंत्र्यांची निवड रखडली
ताज्या घडामोडींमुळे मुख्यमंत्री निवडीची प्रक्रिया रखडली आहे. काँग्रेस हायकमांडने सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवण्याचे संकेत दिल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही निरीक्षक येण्यापूर्वीच गेहलोत यांच्या समर्थकांना याची कुणकुण लागताच त्यांनी वेगवेगळय़ा स्वतंत्र बैठकांचा सपाटा सुरू केला होता. घाईघाईत नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी बैठक बोलावल्याने गेहलोत समर्थकांमध्ये नाराजी आहे.
संघर्ष वाढणार
निवडणुकीच्या वर्षापूर्वी राजस्थानात काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नेत्यांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पक्षाकडे पाहण्याचा लोकांचा समज बदलला आहे. आता गेहलोत आणि पायलट गटातील लढाई पुन्हा एकदा उघडय़ावर आली आहे. सचिन पायलट आणि त्यांचे समर्थक आमदार-मंत्री काही बोलत नाहीत, पण गेहलोत समर्थक आमदार मात्र आता उघडपणे अडथळे निर्माण करू लागल्यामुळे नजिकच्या काळात संघर्ष वाढण्याचे संकेत मिळत आहेत.