झाडे-विद्युतखांब कोसळून नुकसान : शहरवासियांची तारांबळ
प्रतिनिधी /बेळगाव
शुक्रवारी ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह पावसाचे दमदार आगमन झाले. शहरासह उपनगराला पावसाने पुन्हा झोडपले. काही ठिकाणी झाडे कोसळून नुकसान झाले तर सखल रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. जवळपास एक तासाहून अधिक वेळ पाऊस पडल्याने शहरातील बैठय़ाविपेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
काही दिवसांपासून वळिवाचा पाऊस जोरदार होत आहे. पावसामुळे साऱयांचीच तारांबळ उडताना दिसत आहे. अनेक ठिकाणी झाडे व विद्युतखांब कोसळून मोठे नुकसान झाले आहे. दररोज दुपारनंतर वळिवाचे आगमन होत आहे. शुक्रवारीही जोरदार पावसाचे आगमन झाले. वाऱयामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. काही ठिकाणी गटारींमध्ये कचरा अडकल्याने रस्त्यावरून पाणी वाहत होते.
सकाळपासून उष्म्यात वाढ झाली होती. मात्र, पाऊस पडेल असे वातावरण नव्हते. पण अचानक जोरदार वाऱयासह पावसाचे आगमन झाले. त्यामुळे बाजारपेठेतील फेरीवाले, भाजीविपेते व खरेदीदारांची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या काही वर्षांपासून मार्चपासूनच वळिवाला सुरुवात होत आहे. वातावरणातील बदलामुळे वळिवाचे दमदार पाऊस कोसळत आहेत. मात्र, या पावसामुळे मोठे नुकसान होत आहे. नियोजित कार्यक्रमांमध्ये बदल करावा लागत आहे. आंबेडकर जयंतीदिनीही पावसाचे आगमन झाले. त्यामुळे शोभायात्रा व कार्यक्रमांत व्यत्यय निर्माण झाला होता. दररोजच दुपारनंतर पाऊस पडत आहे. त्यामुळे जणू पावसाळय़ालाच सुरुवात झाली, असे वाटू लागले आहे.
पावसाळय़ापूर्वी स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्याची मागणी
शुक्रवारी ‘तरुण भारत’ कार्यालयाच्या समोर असलेल्या मराठी मुलांच्या शाळेसमोरील झाड कोसळले. त्यामध्ये काही वाहनांचे नुकसान झाले. याचबरोबर शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या आहेत. त्याचबरोबर झाडेही कोसळली आहेत. या पावसामुळे स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा बोजवारा उडाला आहे. उपनगरामध्ये स्मार्ट सिटीची अनेक कामे अर्धवट आहेत. त्यामुळे त्याठिकाणी पाणी साचून आहे तर गटारी नसल्याने ते पाणी रस्त्यावरूनच वाहू लागले आहे. पावसाळय़ापूर्वी स्मार्ट सिटीची कामे पूर्ण व्हावीत, अशी मागणी होत आहे. मात्र, ही कामे पूर्ण होण्याची सध्या तरी लक्षणे दिसत नाहीत.
दररोज पाऊस पडत असल्याने आता सखल भागात पाणी साचून राहात आहे. अनेक ठिकाणी डेनेजचे पाणीही बाहेर पडत आहे. अनेक नाल्यांमध्ये कचरा अडकून पाणी साचून राहात आहे. त्यामुळे महापालिकेने मान्सून पावसापूर्वीच नाल्यांची साफसफाई करावी, अशी मागणी होत आहे.
कंग्राळी बुदुक परिसरात पाणीच पाणी

कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, गौंडवाड परिसरात शुक्रवारी संध्याकाळी पडलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून चव्हाट गल्लीस ओढय़ाचे स्वरुप प्राप्त झाले होते. दररोज होत असलेल्या पावसामुळे शेतीची कामे कशी करायची, या विवंचनेमध्ये शेतकरी वर्ग असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कंग्राळी बुद्रुक गावातील चव्हाट गल्ली ही मेन गल्ली आहे. त्यातच ग्रामपंचायतीने नवीन वसाहतींच्या सांडपाण्याच्या गटारी पद्मा गल्लीतील गटारीलाच मिळविल्यामुळे मुसळधार पाऊस पडला की सर्व पाणी एकाच ठिकाणी मिळाल्यानंतर चव्हाट गल्लीला ओढय़ाचे स्वरुप प्राप्त होत आहे. सदर पाणी नेताजी गल्ली, लक्ष्मी गल्ली गटारीतून जाते. परंतु गटारी लहान असल्याने पाणी लक्ष्मी गल्लीतील अनेक घरातून जात आहे.
या भागात शेपू, मेथी, कोथिंबीर, वांगी, भेंडी, मिरची ही पिके घेण्यात आलेली आहेत. परंतु रोजच्या पावसामुळे मिरची पीक जमीनसपाट होत आहे. इतर पिकांचेही नुकसान होत आहे.
कडोली-कंग्राळी मार्गावर झाड कोसळले

वादळी वाऱयासह मुसळधार पावसाने कडोली परिसराला झोडपल्याने कडोली-कंग्राळी मार्गावर झाड पडून काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. शुक्रवारी कडोली, कंग्राळी खुर्द, जाफरवाडी, अलतगा आदी भागात वादळी वारा व विजांचा कडकडाटासह पावसाने झोडपून काढल्याने तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर क्ढडोली-कंग्राळी मार्गावर मोठे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली होती. जेसीबीने झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. परंतु वीजतारा तुटल्याने ठिकठिकाणी वीजपुरवठा बंद होता.