प्रतिनिधी /मडगाव
नागरिकांनी आरोप करण्याऐवजी उपाय सूचवावेत या मडगावच्या नगराध्यक्षांनी पालिका गॅरेज तपासणीदरम्यान केलेल्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना, शॅडो कौन्सिल फॉर मडगावचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी यापूर्वी पालिकेला केलेल्या सूचनांकडे लक्ष वेधले आहे. आम्ही आधीच सूचवलेले आहे की, बीएस-4 इंजिनाच्या ट्रकांच्या खरेदी प्रकरणात चौकशीचे आदेश द्यावेत आणि पालिका तिजोरीला सुमारे 45 लाखांचे नुकसान करणाऱया दोषींकडून सदर नुकसान वसूल करावे, असे कुतिन्हो यांनी म्हटले आहे.
बीएस-4 इंजिन असलेल्या तीन ट्रकांची सरकारच्या मदतीने नोंदणी केली जाईल हा नगराध्यक्षांचा दावा कुतिन्हो यांनी खोडून काढला आहे. वाहन नोंदणीशी संबंधित सर्व सरकारी विभागांशी पत्रव्यवहार करून पालिकेने हे प्रयत्न यापूर्वीच केले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाकडून बीएस-4 इंजिनाच्या वाहनांवर बंदी आली आहे तेव्हा वाहनांची नोंदणी करणारी अधिकारिणी न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन कसे करेल, असा प्रश्न त्यांनी केला आहे. नगराध्यक्षांना आपले गुरू दिगंबर कामत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने कायदे बदलले आहेत असे वाटत असेल, तर ते चुकत आहेत, असे कुतिन्हो यांनी म्हटले आहे.
पालिका मंडळ आणि मंडळावर नियंत्रण ठेवून असलेले नेते पालिका तिजोरीच्या नुकसानास जबाबदार असलेल्या लोकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कुतिन्हो यांनी केला आहे. तीन ट्रक आणि दोन बायो रिक्षा खरेदी करताना सर्व नियमांना बगल देणाऱयांच्या स्वार्थामुळे एकूण 45 लाखांचे नुकसान झाले आहे, असा दावा त्यांनी केला आहे. आम्ही विद्यमान नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांना तीन ट्रकांच्या खरेदीप्रकरणी दक्षता चौकशीची मागणी करताना पालिकेच्या आधीच्या बैठकीत पाहिले होते. त्यावेळी 24 नगरसेवकांनी चौकशीची मागणी केली होती. परंतु तत्कालीन नगराध्यक्षांनी त्याऐवजी समितीला प्राधान्य दिले. आम्ही नगराध्यक्षांना तीन ट्रक आणि दोन बायो रिक्षांच्या खरेदी प्रकरणाची दक्षता विभागामार्फत चौकशी करण्याचे आव्हान देतो, असे कुतिन्हो यांनी म्हटले आहे.