कंग्राळी खुर्द येथे हुतात्म्यांना अभिवादन : हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नसल्याची कार्यकर्त्यांची ग्वाही

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
17 जानेवारी 1956 साली भाषावार प्रांतरचना करण्यात आली. परंतु मराठी भाषिक अधिक असलेला सीमाभाग कर्नाटकात डांबण्यात आला. यामुळे सीमाभागात उद्रेक झाला. याच्या निषेधार्थ सीमाभागातील मराठी भाषिकांचा मूकमोर्चा निघाला असता पोलिसांनी बेधुंद गोळीबार केला. या गोळीबारात मारुती बेन्नाळकर यांनी छातीवर गोळ्या झेलून आपले बलिदान दिले. तर बाळू निलजकर यांचे तुरुंगात निधन झाले. म्हणून या सीमाप्रश्नाची सोडवणूक झाल्यावरच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली लाभणार असल्याचे विचार समितीचे नेते कै. आमदार बी. आय. पाटील यांच्या पत्नी पौर्णिमा पाटील यांनी व्यक्त केले.
कंग्राळी खुर्द येथे हुतात्मा दिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. व्यासपीठावर माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, मार्कंडेय साखर कारखान्याच्या संचालिका निलिमा पावशे, जि. पं. माजी सदस्या सरस्वती पाटील, प्रेमा मोरे, माधुरी हेगडे, कमल मन्नोळकर, ता. पं. माजी अध्यक्षा अर्चना अलगोंडी, मनोहर निलजकर, हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांची कन्या इंदुताई बेन्नाळकर आदी उपस्थित होते.
यावेळी मनोहर किणेकर म्हणाले, सर्व लोकप्रतिनिधीनी एकमताने सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी केंद्र सरकारवर दबाव आणल्यास नक्कीच या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लागू शकतो आणि हुतात्म्यांना हीच खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे सांगितले. शिवाजी सुंठकर म्हणाले, कर्नाटक सरकार आम्हा मराठी भाषिकांवर कितीही अन्याय करू दे. परंतु या लढ्याच्या माध्यमातून हुतात्म्यांनी सांडलेले रक्त आम्ही वाया जाऊ देणार नाही, असे सांगितले.
कृष्णा हुंदरे म्हणाले, सीमाप्रश्न सुटेपर्यंत ही आमची लढाई अशीच सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.
अॅड. सुधीर चव्हाण म्हणाले, छ. शिवाजी महाराजांच्या विचारांचे आचरण व हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण हीच सीमाप्रश्न सोडवणुकीला खरी धार मिळणार आहे. जि. पं. माजी सदस्य रामचंद्र मोदगेकर, एम. आर. चौगुले यांनीही मनोगत व्यकत केले. मनोज पावशे म्हणाले, सीमाप्रश्नाचा हा लढा गेली 66 वर्षे आम्ही लढत आहोत. या लढ्यासाठी 1956 साली बाळ सुंठणकर, बाबुराव ठाकुर, भाई दाजिबा देसाई, भाई एन. डी. पाटील, प्रभाकर पावशे, जी. एल. अष्टेकर, बी. आय. पाटीलसह अनेक सीमासत्याग्रहीनी बलिदान दिले आहे. हे बलिदान वाया जाऊ देऊ देणार नाही. सरस्वती पाटील म्हणाल्या, ज्या हुतात्म्यांनी व सीमासत्याग्रहीनी आपल्या संसाराची पर्वा न करता आपले जीवन संपविले. या सर्वांना सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच खरी श्रद्धांजली ठरणार आहे. सीमासत्याग्रही रामचंद्र पाटील म्हणाले, सध्या माझे वय 95 च्या घरात आहे, उमेदीच्या काळात सत्याग्रह करताना पोलिसांच्या लाठ्या-काठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला. परंतु अजून सीमाप्रश्न सुटला नाही, अशी खंत व्यक्त केली. भागोजी पाटील यांनीही आपले विचार व्यक्त केले. प्रारंभी मध्यवर्ती म. ए. समितीचे सचिव अॅड. एम. जी. पाटील यांनी प्रास्ताविक केले.
तत्पूर्वी हुतात्मा बाळू निलजकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गावच्या चौकातील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन शिवाजी सुंठकर,
अॅड. सुधीर चव्हाण, ग्रा. पं. अध्यक्ष, यल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हुतात्मा मारुती बेन्नाळकर फलकाचे पूजन आर. एम. चौगुले व मनोज पावशे यांच्या हस्ते झाले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कंग्राळी खुर्द शाखा फलकाचे पूजन सरस्वती पाटील व माधुरी हेगडे यांच्या हस्ते झाले. हुतात्मे अमर रहे… अशा घोषणा देऊन हुतात्म्यांच्या पराक्रमाला उजाळा दिला. हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व श्रीफळ वाढवून श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर उपस्थितांनी हुतात्मा बेन्नाळकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले.
बाबुराव पाटलांच्या पोवाड्याने मंत्रमुग्ध
प्रारंभी कंग्राळी खुर्द गावचे ज्येष्ठ सुपूत्र बाबुराव पाटील यांनी हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या पराक्रमाची गाथा सांगताना पोवाड्याचे आपल्या बोली भाषेतून विवेचन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी अॅड. सतिश बांदिवडेकर, ता. पं. माजी सदस्य सुनिल अष्टेकर, भाऊ पाटील, नारायण पाटील, प्रशांत पाटील, वैजनाथ बेन्नाळकर, राकेश पाटील, पी. जी. सर, योगेश पाटील, निंगोजी पाटील, निंगाप्पा जाधव, नानू पाटील, रुक्मिणी निलजकर, ज्योती पाटील, नारायण कालकुंद्रीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, सुरेश अगसगेकर, तानाजी नाईक, शिवाजी राक्षे, प्रदीप तेजम, सचिन गोरले, महेश संगसावी, रमेश माळवी, विनायक बेळगावकर, दत्ता पाटील, सुरेश राजूकर, आर. के. पाटील, लक्ष्मण होनगेकर, मोहन मोरे, पुंडलिक पावशे, शिवाजी मुतगेकर, बाळू देवगेकर, रावजी पाटील, मोनाप्पा संताजी, सदानंद चव्हाणसह समितीचे ज्येष्ठ युवा कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या कन्येला साडी-चोळीचा अहेर
हुतात्मा दिनाचे औचित्य साधून हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांची कन्या इंदुताई बेन्नाळकर हिला पौर्णिमा पाटील व सरस्वती पाटील यांच्या हस्ते सीमावासियांच्यावतीने साडी-चोळीचा अहेर देऊन दिलासा देण्यात आला.
भाई एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली
आम्हा सीमावासियांचे खंदे मार्गदर्शक भाई एन. डी. पाटील यांचे 17 जानेवारी 2022 रोजी निधन झाले. त्याला 17 जानेवारी 2023 रोजी एक वर्ष झाले. यावेळी उपस्थित सीमावासियांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहिली.