चंदिगढ / वृत्तसंस्था
पंजाबमधील होशियारपूर जिह्यातील गड्डीवाला भागातील बैरामपूर चंबोवाल गावात 80 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला अखेर प्राण गमवावे लागले. हृतिक असे संबंधित मुलाचे नाव असून कुत्र्याच्या भीतीने पळून जात असताना रविवारी सकाळच्या सुमारास तो बोअरवेलमध्ये पडला होता. लष्कर आणि एनडीआरएफने 8 तासांनंतर 6 वर्षाच्या मुलाला बोअरवेलमधून बाहेर काढले. त्याची गंभीर स्थिती पाहून तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. हृतिकला बोअरवेलमधून बाहेर काढण्याच्या एक तासापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जिल्हा प्रशासनाला पीडितेच्या कुटुंबीयांना तातडीने 2 लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पीडित कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे.