फेडकॉन राज्यस्तरीय परिषद बेळगावात : 100 सदस्यांचा सहभाग
प्रतिनिधी /बेळगाव
जायंट्स मेन ही संस्था आपली सामाजिक बांधिलकी जपत महत्त्वाचे कार्य करीत आहे. या संस्थेचे शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कार्य गौरवास्पद आहे, असे विचार उद्योजक आप्पासाहेब गुरव यांनी व्यक्त केले. जायंट्स वेल्फेअर फौंडेशनच्या शाखा क्रमांक सहाची ’फेडकॉन’ ही राज्यस्तरीय परिषद कपिलेश्वर रोडवरील शिवम हॉलमध्ये झाली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी फेडरेशनचे अध्यक्ष अनंत जांगळे होते.
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनने या परिषदेचे आयोजन केले होते. व्यासपीठावर जायंट्सचे सेंट्रल कमिटी सदस्य दिनकर अमीन, स्पेशल कमिटी सदस्य मोहन कारेकर, बेळगाव मेनचे अध्यक्ष संजय पाटील, माजी अध्यक्ष मोहन सर्वी, फेडरेशन सेपेटरी अनंत लाड व जायंट्स मेनचे सेपेटरी विजय बनसुर उपस्थित होते. आप्पासाहेब गुरव यांनी दीपप्रज्वलन करून परिषदेचे उद्घाटन केले. बेंगळूर, उडुपी ,धारवाड-हुबळी, ब्रह्मावर, मुनवळ्ळी व बेळगाव आदी ठिकाणाहून आलेल्या 100 सदस्यांचा या परिषदेत सहभाग होता.
विविध विषयावर चर्चा
उद्घाटनानंतर झालेल्या चर्चासत्रात दीनकर अमीन, मोहन कारेकर व फेडरेशनच्या पुढील अध्यक्षा तारादेवी वाली यांनी मार्गदर्शन केले. विविध विषयावर चर्चा झाली आणि जायंट्स चळवळ अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले.
विजेत्या ग्रुप्सचा गौरव
समारोपप्रसंगी जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनच्या जागतिक अध्यक्षा शायना एन. सी. उपस्थित होत्या. त्यांचा सन्मान अनंत जांगळे यांनी केला. शायना यांच्या हस्ते विविध उपक्रमाबद्दल विजेत्या ग्रुप्स व व्यक्तींना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट उपक्रमाबद्दल बेळगाव मेन व बेळगाव सखी यांना सर्वाधिक पुरस्कार मिळाले. अनंत लाड यांनी सूत्रसंचालन केले. विभागीय संचालक मदन बामणे यांनी आभार मानले.