तीन दिवसांची शोध मोहीम यशस्वी : अन्य दोघांचा शोध अजून जारी
प्रतिनिधी / वास्को
झुआरीनगरात बंगला फोडून चोरी करण्याचा प्रयत्न असफल झाल्यानंतर पोलिसांवर गोळीबार करून फरार झालेल्या तिघांपैकी दोघा चोरट्यांना गाजाआड करण्यास पोलिसांना यश आले आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ भागात त्यांना पकडण्यात आले. काल गुरूवारी दुपारी त्यांना हवाईमार्गे गोव्यात आणण्यात आले. अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे अनस अन्सारी (22 वर्षे) व साजीद अन्सारी (36 वर्षे) अशी असून त्यांचा विविध राज्यांतील गुन्हेगारीमध्ये सहभाग आहे.
झुआरीनगरातील एमईएस कॉलेजवळील बंद असलेला एक बंगला फोडून चोरी करण्याचा प्रयत्न सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास झाला होता. वास्कोतील पोलिसांना या चोरीच्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले असता पोलिसांना रोखण्यासाठी तिघा चोरट्यांपैकी एकाने पोलिसांवर गोळीबार केला होता. त्यात सुदैवाने पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील नाईक व होमगार्ड प्रल्हाद नाईक हे बचावले होते. चोरट्यांनी गोळीबार करून थरार निर्माण केल्यानंतर दुचाकीवर बसून पलायन केले होते. मात्र, पोलिसांनी लगेच नाकाबंदी केल्याने त्या चोरट्यांना दुचाकी रस्त्यावरच टाकून पसार होणे भाग पडले होते. अखेर तीन दिवसांच्या खडतर प्रयत्नांनंतर पोलिसांना तिघांपैकी दोघांना गजाआड करण्यात यश आले. सोमवारी पहाटे पोलिसांनाच बंदुकीचा धाक दाखवून पसार झाल्यानंतर या चोरट्यांना पकडण्यासाठी गोव्यात सर्वत्र सर्तकतेचे आवाहन करण्यात आले होते. नाकाबंदी आणि सिमेवरही पाळत ठेवण्यात आली होती. या चोरट्यांना पकडण्यासाठी दक्षिण गोव्यातील विविध पोलीस स्थानकांच्या पोलिसांची पथके तयार करण्यात आली होती. त्या चोरट्यांबद्दल माहिती मिळवण्यास यश आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरूध्द लुककाऊट नोटीस जारी केली होती. तरीही त्या चोरट्यांनी गोव्याची सीमा पार करण्यात यश मिळवले होते.
पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांच्यासह दक्षिण गोव्यातील आठ पोलिसांचे पथक या चोरट्यांच्या शोधार्थ दिल्लीला रवाना झाले होते. तेथून त्यांनी उत्तर प्रदेशमधील मेरठ गाठले. गुरूवारी पहाटे त्यांनी चोरट्यांना मेरठ येथे ताब्यात घेतले आणि तेथून दिल्लीहून दुपारी हवाईमार्गे गोव्यातील दाबोळी विमानतळावर आणण्यात आले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या चोरट्यांनी वास्कोतील चिखली येथे सोनसाखळी हिसकावली होती. नुवे भागात एक दुचाकीही त्यांनी चोरली. तसेच लोटली भागात एका वृध्द महिलेच्या हातातील बांगड्या खेचण्याचा प्रयत्न केला होता. सीसीटीव्ही फुटेजवरून या चोरट्यांची ओळख पटली होती. चारजणांची टोळी बनून ते गोव्यात आले होते. त्यांच्या अन्य दोन साथीदारांचा शोध अद्याप जारी आहे.