आप्पाचीवाडी-कुर्ली हालसिद्धनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ
कोगनोळी : कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश येथील लाखो भाविकांचे श्र्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आप्पाचीवाडी-कुर्ली (ता. निपाणी) येथील हालसिद्धनाथ देवाच्या चैत्र यात्रेला उत्साहाने प्रारंभ झाला. प्रतिवषी गुढी पाडव्यादिवशी ही चैत्र यात्रा भरत असते. यावेळी चैत्र पाडव्यानिमित्त सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. 22 रोजी कुर्ली येथील हालसिद्धनाथ मंदिरातून पालखी सवाद्य मिरवणुकीने आप्पाचीवाडी येथील खडक मंदिरात आणण्यात आली. यावेळी मंदिर प्रदक्षिणा झाली. भाविकांनी हेडाम खेळ, मूर्तीची विधीवत पूजा करून मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळी 7 वाजता व रात्री 7 वाजता आरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. रात्री ढोलजागर वालंगाचा कार्यक्रम झाला तर अनेक भाविकांनी दंडवत घातले. दिवसभर नैवेद्य देण्यासाठी आप्पाचीवाडी-कुर्लीसह पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती. दरम्यान यात्रेच्या पार्श्वभूमीवर अनेक विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. तसेच दिवसभर हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.