आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा इशारा
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आरबीआयचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हणजेच भारतातील हिंदू विकास दराविषयी महत्त्वाचा इशारा दिला आहे. खासगी क्षेत्रातील खालावलेली गुंतवणूक, उच्च व्याजदर, मंदावलेला आर्थिक विकास दर यामुळे भारत देश हा हिंदू विकास दराच्या जवळ आला असल्याचे रघुराम राजन यांनी म्हटले आहे.
हिंदू रेट ऑफ ग्रोथ ही अर्थशास्त्रातील एक संज्ञा आहे. याचा संबंध कुठल्याही धर्माशी जोडलेला नाही. मात्र आर्थिक व्यासपीठावर या शब्दाचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर देशातील बहुतांश लोक शेतीवर अवलंबून होते. तसेच देशात मोठय़ा प्रमाणात गरीबी होती. पायाभूत सुविधांमध्ये केवळ रेल्वेचीच व्यवस्था होती, रस्त्यांचा अभाव होता. मात्र त्यानंतर पायाभूत विकासाच्या दिशेने पावले टाकण्यात आली. स्वातंत्र्याला 30 वर्षे पूर्ण होइपर्यंत विकास दर कमीच होता. या मंदगतीने विकास करणाऱया विकास दराविषयी बोलताना 1978 मध्ये हिंदू रेट ऑफ ग्रोथ हा उल्लेख झाला होता. प्रसिद्ध प्राध्यापक राज कृष्ण यांनी हा उल्लेख प्रथम केला होता. भारताचा विकास दर पहिल्या 30 वर्षांमध्ये 3.5 टक्के किंवा त्याहून कमी होता. त्यामुळेच हिंदू विकास दर असा शब्द प्रचलित झाला होता.
रघुराम राजन यांनी मागील महिन्यात राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून आकडेवारीच्या आधारावर विकासदरात सातत्याने घट होत असल्याचे म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱया तिमाहीत विकासदर केवळ 4.4 टक्के राहिला आहे. हा आकडा मोठय़ा चिंतेचे कारण ठरत असल्याचे राजन यांचे म्हणणे आहे.
अनुक्रमिक मंदी हा चिंतेचा विषय आहे. खासगी क्षेत्र गुंतवणुकीसाठी तयार नाही, दुसरीकडे रिझर्व्ह बँकेकडून सातत्याने व्याजदरात वाढ केली जात आहे. या सर्व स्थितीदरम्यान जागतिक विकासदरही मंदावण्याची भीती आहे. पुढील आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 5 टक्के राहिला तरीही आम्ही सुदैवी ठरू असे उद्गार राजन यांनी मुलाखतीत काढले आहेत.
मला वाटणारी भीती चुकीची नाही. आरबीआयने चालू आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत विकासदर 4.2 टक्के राहणार असल्याचा अनुमान व्यक्त केला आहे. विकासदराचा हा वेग आमच्या जुन्या ‘हिंदू ग्रोथ रेट’च्या धोकादायक स्वरुपासमीप आहे. आम्हाला स्थिती सुधारावी लागणार असल्याचे राजन यांनी म्हटले आहे.