प्रतिनिधी/ फोंडा
फोंडा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शनिवार 15 रोजी तिघा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका गिताली तळावलीकर, भारत पुरोहित व अॅड. प्रतिक्षा प्रदीप नाईक यांचा त्यात समावेश आहे.
गिताली तळावलीकर यांनी शांतीनगर प्रभाग 15 मधून उमेदवारी अर्ज भरला आहे. मागील दोन कार्यकाळ नगरसेविका राहिलेल्या गिताली या तिसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. त्या मगो समर्थक उमेदवार असल्या तरी, त्यांनी आपला अद्याप कुठलाही पक्ष किंवा पॅनलच्या पाठिंब्याविषयी अधिकृत निर्णय झालेला नाही अशी प्रतिक्रिया दिली. वारखंडे प्रभाग 8 मधून माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्रदीप नाईक यांच्या कन्या अॅड. प्रतिक्षा नाईक यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. हा प्रभाग महिलांसाठी राखीव असल्याने प्रदीप नाईक यांच्याऐवजी त्यांची मुलगी प्रतिक्षा या उमेदवारी करीत आहेत. खडपाबांध प्रभाग 7 मधून भारत पुरोहित यांनी अर्ज भरला असून ते पहिल्यांदाच निवडणूक लढवित आहेत. फोंडा भाजप मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक विश्वनाथ उर्फ अपूर्व दळवी यांच्या विरोधात त्यांनी उमेदवारी दाखल केल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. निर्वाचन अधिकारी रघुराज फळदेसाई यांनी त्यांचे अर्ज स्वीकारले. यावेळी साहाय्यक निर्वाचन अधिकारी विमोद दलाल हे उपस्थित होते.
आज रविवारी सुट्टी असून सोमवार 17 व मंगळवार 18 असे दोन दिवस राहिले आहेत. त्यामुळे सोमवारी बहुतेक उमेदवार अर्ज भरणार आहेत. नगराध्यक्ष रितेश रवी नाईक, त्यांचे बंधू रॉय नाईक, भाजप मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक विश्वनाथ दळवी यांच्यासह उर्वरीत इच्छुक नगरसेवक सोमवारी अर्ज भरणार आहेत.