पुन्हा फुटण्याच्या भीतीने पाच आमदारांना चेन्नईला हलविले
प्रतिनिधी/ पणजी
काँग्रेसला सतावणारी अस्थिरतेची भीती आणि फुटीरतेचा धोका संपता संपेना अशी स्थिती आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाकणाऱया हायकमांडने सोमवारी होणाऱया राष्ट्रपतीपद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पाच आमदारांना चेन्नई येथे हलविले आहेत. यावरून काँग्रेसकडे केवळ पाचच आमदार शिल्लक राहिले आहेत यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
काँग्रेसकडे 11 आमदार असले तरीही त्यातील सहाजण आजही तळ्यातमळ्यात करत असल्याने सध्या हाती असलेल्या पाचजणांना तरी ताब्यात ठेवावे यासाठी काँग्रसचा खटाटोप जारी आहे. त्यातूनच पक्षाने त्यांना चेन्नई येथे नेऊन ठेवले आहेत. संकल्प आमोणकर, युरी आलेमाव, कार्लुस फरेरा, रुडाल्फ फर्नांडिस आणि ऍल्टन डिकॉस्ता यांचा त्यात समावेश आहे.

काँग्रेसमधील या बंडाला गत रविवारी प्रारंभ झाला होता. ते अद्याप शमलेले नाही. हायकमांडच्या हस्तक्षेपामुळे रविवारी झालेले बंड काहीअंशी शमविण्यात काँग्रेसला यश आले होते. परंतु आग अद्याप विझलेली नाही याचा प्रत्यय आठवडाभरातच पुन्हा दिसून आला व आज रविवारी पुन्हा दोघे नेते बंडखोर गटात सामील होण्याची वार्ता पसरताच काँग्रेसने शनिवारी तत्काळ त्यांना चेन्नईत पाठविण्याची चाल खेळली असल्याचे वृत्त आहे. सदर दोन्ही नेते बंडखोर गटास मिळाल्यास दोन तृतीयांश संख्याबळ पूर्ण होऊन सर्वजण सहजपणे भाजपात प्रवेश करू शकणार आहेत. तेच रोखण्याचे काँग्रेसचे हरप्रकारे प्रयत्न चालू आहेत. सध्या कथित बंडखोरांमध्ये दिगंबर कामत, मायकल लोबो, डिलायला लोबो, राजेश फळदेसाई, केदार नाईक, आलेक्स सिक्वेरा यांचा समावेश आहे.
मायकल लोबो यांना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवावे, अशी मागणी काँग्रेस करत असली तरी तांत्रिकदृष्टय़ा ते शक्य होणारे नाही. कारण लोबो गटात सहा जण तर उर्वरितांमध्ये पाच जणांचा समावेश आहे. त्यामुळे ज्यांचे संख्याबळ जास्त त्यांचाच विरोधी पक्षनेता बनू शकतो. परिणामी काँग्रेसची मागणी पूर्ण होणे कठीण आहे.
दरम्यान, हे आमदार आता थेट राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी गोव्यात परतणार आहेत. या निवडणुकीवेळी कोणताही आमदार फुटू नये व क्रॉस मतदान होऊ नये यासाठी काँग्रेसने घेतलेली ही खबरदारी कितपत फळास येते ते सोमवारीच दिसून येणार आहे.