पुणे / प्रतिनिधी :
‘गो फर्स्ट एअरलाइन्स’च्या ऐन सुटीच्या हंगामातील दिवाळखोरीच्या निर्णयामुळे पर्यटक व त्यांना सेवा पुरवणाऱ्या पर्यटन संस्था यांची प्रचंड गैरसोय झाली असून, एकूण पर्यटन व्यवसायच अडचणीत आला आहे. वारंवार उद्भवणाऱ्या या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ‘टॅव्हल्स एजंट असोसिएशन, पुणे’ने सरकारकडे केली आहे.
यासंदर्भात संस्थेकडून निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता दोन दिवस सेवा बंद करण्याच्या व पुढे ही सेवा चालू राहील की नाही याबद्दत कोणतेही ठाम आश्वासन किंवा शाश्वती सदर कंपनीने दिलेली नाही. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. वास्तविक कोविड-19 महामारीमुळे दीर्घकाळ व्यवसाय बंद होता. सरकार व कोणाच्याही मदतीविना तो कुठेतरी उभा राहत होता. याचप्रमाणे सामान्य पर्यटकही गेल्या दोन-तीन वर्षात कुठेही पर्यटनासाठी आर्थिक अडचणीमुळे व निर्बंधामुळे फिरू शकला नव्हता. अशातच सर्वच गोष्टींच्या किमती गगनाला भिडलेल्या असतानाही आपल्या बचतीतून व मेहनतीने कमवलेल्या पैशातून या हंगामात बहुतेक लोकांनी पर्यटनाच्या काही महिन्यापूर्वी योजना आखल्या होत्या. मात्र अचानक गो फर्स्ट एअरलाईन्सने सर्व पर्यटकांना धक्का दिला. त्यामुळे पर्यटन कंपन्यांची प्रचंड तारांबळ उडाली आहे. पर्यटन संस्थांकडून उन्हाळी पर्यटनाचे नियोजन हे सहा महिन्यांपूर्वी केले जाते. त्यासाठी विमान कंपन्या, हॉटेल्स, लोकल सेवा देणाऱ्या पर्यटकांची वाहतूक करणाऱ्या, याप्रमाणे इतर बऱ्याच गोष्टींवर आगाऊ परत न मिळणायोग्य देयके अदा करावी लागतात. अचानक उद्भवलेल्या राजकीय, नैसर्गिक, कृत्रिम (गो फर्स्टसारख्या) येणाऱ्या संकटांमुळे, पर्यटन संस्था अडचणीत येतात. चूक नसतानाही पर्यटन संस्थांना पर्यटकांच्या रोषाला व कायदेशीर गोष्टींना सामोरे जावे लागते.
म्हणूनच यावर दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात. पर्यटन कंपन्यांनी पर्यटकांचे भरलेले पैसे विमान कंपन्याकडे कायम सुरक्षित कसे राहतील, यावर त्वरित काम करून अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. यापूर्वी किंगफिशर एअरलाइन, जेट एअरवेज यासारख्या कंपन्यांनी ऐन पर्यटनाच्या हंगामात याच प्रकारे सर्वांना अडचणीत आणलेले आहेत. आजपर्यंत ग्राहकांचे व पर्यटन कंपन्याचा त्यांनी एक रुपयाही परत दिलेला नाही, असे किती दिवस चालणार ? त्यांच्यावर कधी कारवाई होणार?, हे होऊ नये म्हणून कधी उपाययोजना होणार?, ग्राहकांचे पैसे सुरक्षित आहेत की नाही, ही कंपनीबरोबर काम करते आहे की नाही यावर काही आचारसंहिता असणार आहे की नाही, असा सवाल याबाबतच्या निवेदनात करण्यात आला आहे.
विमान कंपन्यांकडून पर्यटकांची दिशाभूल
विमान कंपन्यांकडून पर्यटकांची दिशाभूल केली जाते. रिफंड केल्याचे सांगितले जाते. पण तो रिफंड त्यांनी त्यांच्याच व्हर्च्युअल (आभासी) अकाउंटमध्ये दिलेला आहे, जो कधीही बँकेत येत नाही. तो फक्त आणि फक्त त्याच विमान कंपन्यांची तिकीट बुक करण्यासाठी वापरता जाऊ शकतो. एअरलाईन्सच बंद पडली, तर हा व्हर्च्युअल (आभासी) अकाउंटमधला रिफंड कुठे वापरावा? त्याबद्दल आम्हाला जर डीजीसीएने मार्गदर्शन केले तर फार बरे होईल, असेही यात म्हटले आहे.