ऑनलाईन टीम/तरुण भारत
ऑस्ट्रेलियामधील एका तरुणीच्या हत्या करून फरार झालेल्या आणि तब्ब्ल तब्बल साडे पाच कोटींचं बक्षीस असणाऱ्या मोस्ट वाँटेड आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. राजविंद्र सिंग (rajwinder singh) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. राजविंदर सिंग हा २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियातील (Australia) क्वीन्सलँड येथे एका ऑस्ट्रेलियन महिलेच्या हत्याप्रकरणात फरार होता. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने राजविंदर सिंग याला ताब्यात घेतले आहे. राजविंद्र सिंग गेल्या चार वर्षांपासून फरार होता. क्वीन्सलँड पोलिसांनी (Queensland’s Police) राजविंदर सिंगच्या अटकेवर 1 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच तब्बल साडे पाच कोटींचं बक्षीस ठेवले होते.
राजविंद्र सिंग याने तोह्या कॉर्डिंगले नावाच्या २४ वर्षीय तरुणीची २१ ऑक्टोबर २०१८ रोजी हत्या केली होती. क्विन्सलॅण्डमधील वँगेटी समुद्रकिनाऱ्यावर तोह्या तिच्या कुत्र्याबरोबर वॉकसाठी आलेली आलेली असताना राजविंद्रने तिच्यावर हल्ला केला. यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर राजविंद्रने पुढील दोन दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियातून पलायन केलं. विशेष म्हणजे एका रुग्णालयामध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या राजविंद्रने आपली नोकरी, पत्नी आणि तीन मुलांना ऑस्ट्रेलियात सोडून पळ काढला.
हे ही वाचा : सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठात अथर्वशीर्ष अभ्यासक्रम सुरु ; तर अनेकांचा विरोध
दरम्यान, क्वीन्सलँड पोलीस बऱ्याच दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. सीबीआय, इंटरपोल आणि स्पेशल सेलने केलेल्या संयुक्त कारवाईत गुप्त माहितीच्या मदतीने आरोपी राजविंदर सिंगला पकडण्यात आले. इंटरपोलने या आरोपीबाबत रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती. यासोबतच भारतातील सीबीआय आणि इंटरपोलने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.