प्रतिनिधी /बेळगाव
केएलई स्कूल ऑफ म्युझिकच्यावतीने दिवंगत भजनाचार्य पं. बी. व्ही. कडलास्कर बुवा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पारंपरिक भजन स्पर्धा घेण्यात आल्या. दिवंगत नलिनी गोगटे यांच्या स्मरणार्थ डॉ. अभिजीत आणि डॉ. वंदना गोगटे यांनी ही स्पर्धा प्रायोजित केली होती. या स्पर्धेमध्ये उत्तर कर्नाटक, बेळगाव, गोकाक, रामदुर्ग, बैलहोंगल, चिकोडी, चिंचली, कोल्हापूर या भागातून एकूण 26 भजनी मंडळांनी भाग घेतला होता.
यावेळी बुवांचे शिष्य मीनाताई कुलकर्णी, पं. राजप्रभू धोत्रे, रुद्रम्मा याळगी, सीमा कुलकर्णी, गुरुराज कुलकर्णी, जितेंद्र साबण्णावर, वामन वागुकर यांचा केएलई स्कूल ऑफ म्युझिकच्यावतीने सत्कार करण्यात आला. या स्पर्धेमध्ये शबरीदेवी भजनी मंडळ, रामदुर्ग आणि विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ, कुदेमनी यांना पहिला क्रमांक विभागून रुपये 15,000 देण्यात आले.
दुसरे बक्षीस रुपये 10,000 श्री पवाड बसवेश्वर भजनी मंडळ बैलहोंगल इंचल आणि राजा पंढरीनाथ भजनी मंडळ गळतगा यांना विभागून देण्यात आले. तिसरे बक्षीस रुपये 5000 रोख सत्यवीरतीर्थ महिला भजनी मंडळ, गोकाक यांना देण्यात आले. आणखी दोन उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. गोव्याचे संदेश नाईक आणि अरुणदास नाईक यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
जे. एन. मेडिकल कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल डॉ. राजेश पवार, डॉ. राजेंद्र भांडणकर, डॉ. अभिजीत आणि डॉ. वंदना गोगटे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण केले. परीक्षकांचा तसेच डॉ. गोगटे यांचा सत्कार केएलई स्कूल ऑफ म्युझिकच्या प्राचार्या डॉ. स्नेहा राजुरीकर, डॉ. दुर्गा नाडकर्णी, डॉ. सुनीता पाटील तसेच यादवेंद्र पुजारी, जितेंद्र साबण्णावर, राहुल मंडोळकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला संगीत रसिकांचा प्रतिसाद मिळाला.