गोगटे चौकात चारही बाजूंनी येणाऱया वाहनांमुळे मार्ग काढताना कसरत

प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील 16 चौकांमध्ये ट्रफिक सिग्नल बसविण्यात आले आहेत. यापैकी काही मोजकेच सिग्नल सुरू असून महत्त्वाच्या चौकातील ट्रफिक सिग्नल बंद असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. विशेषतः गोगटे चौकातील ट्रफिक सिग्नल बंदच ठेवण्यात आल्याने या ठिकाणी वाहनधारकांची तारांबळ उडत आहे.
शहरात दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. तसेच विविध चौकांमध्ये वाहनांची कोंडी होत असल्याने सुरळीत वाहतुकीसाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत 16 चौकांमध्ये ट्रफिक सिग्नल बसविण्यात आले आहेत. मात्र यापैकी काही मोजकेच सिग्नल सुरू असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत असतानाच काहीवेळा अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
गोगटे चौकात खानापूर रोड, काँग्रेस रोड व रेल्वेस्टेशनकडून येणारे रस्ते मिळत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. चारही बाजूंनी येणाऱया वाहनांमुळे मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागते. वास्तविक पाहता या चौकातील सिग्नल सुरू ठेवणे गरजेचे आहे. पण रहदारी प्रशासनासह महापालिकेने ट्रफिक सिग्नल सुरू ठेवण्याकडे कानाडोळा केला आहे. बसवेश्वर उड्डाणपुलाकडून येणारी वाहने, काँग्रेस रोड व खानापूर रोडवरून येणाऱया वाहनांमुळे चौकात गर्दी होते. काहीवेळा वाहनधारक भरधाव वाहने चालवितात. त्यावेळी चौकात रस्ता ओलांडताना अपघात होत असतात. रहदारी पोलिसांची नियुक्ती केली जाते. पण चारही बाजूंनी येणाऱया वाहनधारकांवर नियंत्रण ठेवताना रहदारी पोलिसांची दमछाक उडते.
वाहनधारकांना अडचणी…
वाहनधारकांची तपासणी करण्यासाठी चार ते पाच रहदारी पोलीस थांबलेले असतात. पण चौकात वाहतूक कोंडी झाली तरी याकडे लक्ष देत नाहीत. केवळ दंड वसुलीच्या कामात गुंतलेले असतात. त्यामुळे येथील ट्रफिक सिग्नल सुरू करणे अत्यावश्यक असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. तसेच आरटीओ चौकासमोरील ट्रफिक सिग्नल बंद ठेवल्याने वाहनधारकांना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी बंद असलेले ट्रफिक सिग्नल सुरू करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.