पणजी : राज्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद (भाऊसाहेब) बांदोडकर यांना काल रविवारी त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून आदरांजली वाहण्यात आली. त्यानिमित्त राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाऊसाहेबांचे अनेक ठिकाणी पुतळे उभारण्यात आले असून त्या सर्व ठिकाणी त्या त्या भागातील लोकप्रतिनिधी, अन्य मान्यवर व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून त्यांना अभिवादन केले. प्रमुख कार्यक्रम मिरामार येथे त्यांच्या स्मृतीस्थळावर आयोजित करण्यात आला होता. तेथे सकाळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यात प्रामुख्याने मगो नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर, सभापती रमेश तवडकर, राज्याचे मुख्य सचिव पुनितकुमार गोयल, पोलीस महासंचालक जसपाल सिंग, भाऊसाहेबांचे नातू यतीन काकोडकर यांच्यासह अन्य सरकारी वरिष्ठ अधिकारी आणि विद्यार्थी यांचा समावेश होता. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुक्त गोव्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारलेल्या भाऊंनी आपल्या कारकीर्दीत तळागाळातील लोकांना शिक्षण मिळावे यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी गावोगावी सरकारी शाळा स्थापन केल्या. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात गोव्याने भरीव कामगिरी केली व परिणामस्वरूप गोवा सर्व क्षेत्रात विकसित होण्यात मदत झाली. भाऊंच्या या योगदानाचे स्मरण आजही करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
Previous Articleशिवोलीत भाडेकरुनी केली गोहत्या
Next Article नेत्रावळी अभयारण्यातही आग
Related Posts
Add A Comment