चंदीगड
पंजाब पोलिसांनी दहशतवादी कारवायांशी संबंधित एका मोठय़ा मॉडय़ूलचा पर्दाफाश केला आहे. या मॉडय़ूलच्या दोन सदस्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक एके-56 रायफल, दोन मॅगझिन आणि 90 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. संशयितांकडून शस्त्रसाठय़ासह काही महत्त्वपूर्ण दस्तावेजही जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेले संशयित पाकिस्तानमधील आयएसआय समर्थित संघटनांचे हस्तक असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर कॅनडास्थित लखबीर लांडा आणि पाकिस्तानस्थित हरविंदर रिंडा यांचे नियंत्रण असल्याचेही तपास यंत्रणांकडून सांगण्यात आले.
काश्मीरसोबतच पंजाबमधील वातावरण बिघडवण्यासाठी धार्मिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या लोकांवर हल्ले करण्याचा कट पाकिस्तानपुरस्कृत संघटनांकडून रचला जात आहे. भारताकडून वेळोवेळी संशयितांवर कारवाई होत असली तरी पाकिस्तानने आपल्या कुरापती बंद केलेल्या नाहीत. गेल्या आठवडय़ात पोलिसांनी पंजाबमध्ये पाच दहशतवाद्यांना कारमधून जात असताना पकडले होते आणि त्यांच्याकडील मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला होता.