पाचपैकी केवळ तीनच फेरीबोटी कार्यरत : कर्मचारी रजेवर गेल्याने उद्भवली परिस्थिती,अनेकांना नोकरीवर पोहोचण्यास उशीर

वार्ताहर /जुने गोवे
रायबंदर ते चोडण जलमार्गावर वाहतूक करणाऱया फेरीबोटींची संख्या अचानक कमी झाल्याने मंगळवारी आणि बुधवारी प्रवाशांचे अतोनात हाल झाले. या मार्गावर नेहमी पाच फेरीबोटी प्रवाशांची वाहतूक करायच्या, पण गेले दोन दिवस फक्त तीनच फेरीबोटी कार्यरत असल्याने प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागला.
काल बुधवारीही तीनच फेरीबोटी सेवेत असल्याने प्रवाशांना तास ते दीड तास दोन्ही बाजूंच्या धक्क्यांवर भर उन्हात ताटकळत राहावे लागले. दुचाकी तसेच चार चाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यातच काहींनी वाहने बेशिस्तपणे लावल्याने वाहतुकीतही अडथळा निर्माण झाला. सर्वांचीच तारांबळ उडाल्याचे चित्र गेले दोन दिवस रायबंदर – चोडण फेरीबोट धक्क्यांवर दिसत होते.
खात्याने आदल्या दिवशी कळवावे
फेरीबोटींची ही अशी स्थिती चालूच राहिल्यास प्रवासी आंदोलन करण्याची भाषा करत होते. नदी परिवहन खात्याने या मार्गावरील फेरीबोट सेवेत ताबडतोब सुधारणा करावी अशी प्रवाशांची मागणी आहे. फेरीबोटींची संख्या कमी असल्यास खात्याने त्याबाबत जनतेला आदल्या दिवशी कळवावे, अशीही मागणी होत आहे.
नोकरी, व्यवसायावर पोहोचण्यास उशीर
फेरीबोटींच्या कमतरतेमुळे प्रवाशांचे बरेच हाल झाले. दोन्ही दिवशी अनेकांना नोकरी तसेच धंदय़ाकडे किंवा अन्य इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी बराच उशीर झाला. त्यामुळे अनेकांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागला. ऐन उन्हाळय़ाच्या असहय़ उकाडय़ात लोकांना गर्दीमध्ये राहावे लागल्याने प्रखर उन्हाचा त्रासही लोकांना सहन करावा लागला. एकाच वेळेला सुमारे दीडशे ते दोनशे दुचाकी व सुमारे दीडशे चारचाकी वाहने रांगांमध्ये उभी होती. एरव्ही पाच फेरीबोटी असल्यासही गर्दी असतेच, त्यामुळे काल फेरीबोटी कमी झाल्याने आणखी त्रास झाला.
अगोदरच फेरीबोटींची संख्या कमी होती, त्यातच मांडवीला पाणी कमी असल्यामुळे आणि वारे वाहत असल्याने फेरीबोट धक्क्याला व्यवस्थितपणे लागत नव्हती. त्यामुळे वाहने फेरीबोटीतून बाहेर काढताना आणि आत घेताना वाहनचालकांना धोकादायक कसरत करावी लागत होती. नदीपरिवहन मंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन येथील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
फेरीसेवेत लवकरच होणार सुधारणा : आमदार
मये मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेट यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, आपणास लोकांना होणाऱया त्रासाची कल्पना आहे. आपण याबाबत नदी परिवहनमंत्र्यांकडे बोललो आहे. काही कर्मचारी आजारपणाच्या व इतर रजेवर असल्याने फेरीबोटी बंद राहण्याची परिस्थिती उद्भवली आहे. अन्य काही कर्मचाऱयांना ताबडतोब कामावर रुजू होण्यास सांगितले असून लवकरच फेरीबोट सेवेत सुधारणा होईल, असेही शेट यांनी सांगितले.