250 प्रवाशांना वाचविले ः दुर्घटनेत 85 प्रवासी जखमी
वृत्तसंस्था/ अथेन्स
ग्रीसमध्ये मंगळवारी रात्री उशिरा 2 रेल्वेगाडय़ांची टक्कर झाली आहे. या दुर्घटनेत 32 जणांचा मृत्यू झाला असून 85 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मध्य ग्रीसच्या लारिया शहरानजीक एक पॅसेंजर रेल्वे आणि एका मालगाडीची टक्कर झाली आहे. पॅसेंजर रेल्वेमधून 350 हून अधिक जण प्रवास करत होते, यातील 250 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तर दुर्घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमींपैकी 19 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

अथेन्सहून थेसालोनिकी शहराच्या दिशेने पॅसेंजर रेल्वे धावत होती. तर मालगाडी थेसालोनिकीहून लारिसाच्या दिशेने प्रवास करत होती. दोन्ही रेल्वेंदरम्यान टक्कर झाल्याने पॅसेंजर रेल्वेचे 4 डबे रुळावरून घसरले. तर 2 डब्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुर्घटनेनंतर रेल्वेगाडीला आग लागली, अग्निशमन दलाने तेथे धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे.
रेल्वेचा पुढील हिस्सा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. दुर्घटनेनंतर चहुबाजूला अवशेष फैलावले असल्याने बचावकार्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. तुटलेले डबे आणि अवशेष हटविण्यासाठी क्रेन बोलाविण्यात आली असल्याचे थेसालीचे गव्हर्नर कोन्सतांतिनोस यांनी सांगितले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर अन्य प्रवाशांना एका बसद्वारे थेसालोनिकी येथे पाठविण्यात आले आहे. बचाव कर्मचारी अद्याप दुर्घटनास्थळी असून त्यांच्याकडून शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.