वार्ताहर/ माशेल
आमोणे पुलाजवळ टेम्पो व दुचाकी यांच्यात समोरासमोर टक्कर होउढन झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. आंतानासियो डिसोझा (वय 25, रा. सांताप्रुझ, आराडीबांध) असे मयताचे नाव आहे. तसेच दुचाकीच्या पाठीमागे बसलेला युवक गंभीर जखमी झाला आहे. सदर अपघात शनिवार दि. 23 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडला.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा टेम्पो जीए-01-यू-8482 माशेलहून सांखळीकडे जात होता. तर दुचाकी स्प्लेन्डर जीए-07-जे-7062 ही सांखळीहून माशेलच्या दिशेने येत होती. दोन्ही वाहने आमोणे पुलाजवळ आली असता त्यांच्यात समोरासमोर टक्कर झाली. यात दुचाकी टेम्पोच्या दर्शनी भागाला आदळून तिचा चक्काचूर झाला. या अपघातात दुचाकी चालक डिसोझा हा जागीच ठार झाला. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला युवक देखील गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत बांबोळी येथे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघात प्रकरणी फोंडा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलीस उपनिरीक्षक रश्मी भाईडकर अधिक तपास करीत आहेत.