वार्ताहर /उचगाव
विद्यार्थ्यांची बौद्धिक व शारीरिक वाढ होण्यासाठी स्पर्धेमध्ये भाग घेणे महत्त्वाचे आहे. खेळाकडे त्यांनी आनंदाने पाहिले पाहिजे. त्यामध्ये सातत्य असणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. म्हणून विद्यार्थ्यांनी खेळामध्ये भाग घ्यावा, असे आवाहन अभियंते आणि सामाजिक कार्यकर्ते आर. एम. चौगुले यांनी केले.
सार्वजनिक शिक्षण खाते तालुका विभाग बेळगाव यांच्या विद्यमाने विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन मण्णूर येथील कलमेश्वर हायस्कूलच्या क्रीडांगणावर केले होते. या स्पर्धांना नुकताच प्रारंभ करण्यात आला. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कलमेश्वर शिक्षण संस्थेचे सेपेटरी अजय नाईक होते.
क्रीडा ज्योतीचे स्वागत
प्रारंभी विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ता. पं. माजी सदस्य यल्लाप्पा कोळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला कलमेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी. के. नाईक, मृणाल हेब्बाळकर, ता. पं. माजी सदस्य एस. एल. चौगुले, ग्रा. पं. अध्यक्ष चेतन पाटील, नारायण शहापूरकर, नारायण कालकुंद्री, एन. ओ. चौगुले, बी. बी. सांबरेकर आदी उपस्थित होते. कलमेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी क्रीडाज्योत मैदानावर आणल्यानंतर स्वागत करण्यात आले. यावेळी आर. एम. चौगुले यांनी भेटीदाखल दिलेले अप्पर खेळाडूंना वितरित करण्यात आले.
मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक वाय. के. नाईक यांनी केले. सूत्रसंचालन एस. एल. नावगेकर यांनी केले. आभार यू. एस. सांगेलकर यांनी मानले.